Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्त्री २'नंतर श्रद्धा कपूरच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ईथा'चं शूटिंग संपलं; 'या' भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:39 IST

या भूमिकेसाठी श्रद्धाने प्रचंड मेहनत घेतली आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईथा' सिनेमात ती दिसणार आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर सिनेमा आधारित आहे. दरम्यान सिनेमाचं शूट नुकतंच संपलं असून लवकरच सिनेमाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. १९४० ते १९९० या काळातील विठाबाईंचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. या भूमिकेसाठी श्रद्धाने प्रचंड मेहनत घेतली आहे.

महाराष्ट्रातील भोर येथे एका भव्य मोंटाज गाण्याचे चित्रीकरण करून श्रद्धाने शूटिंग पूर्ण केलं आहे.  'मिड-डे'च्या वृत्तानुसार, ५ मे रोजी या शेवटच्या गाण्याचे चित्रीकरण पार पडले. या गाण्यात श्रद्धासोबत सुमारे ८०० कलाकार आणि बॅकग्राउंड डान्सर्सचा समावेश होता. भोरमध्ये चित्रीत झालेले हे गाणे विठाबाईंच्या संपूर्ण प्रवासाचा सारांश देणारे एक 'मोंटाज साँग' आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चेंटने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. मार्चमध्ये सुरू झालेल्या ६० दिवसांच्या सलग शूटिंग शेड्यूलचा हा शेवटचा दिवस होता.

सिनेमातील एका गाण्याच्या शूटवेळी श्रद्धाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे ती बेडरेस्टवर होती. तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली होती. 'ईथा'च्या चित्रीकरणासाठी टीमने महाराष्ट्रातील विविध भागांत शूटिंग केलं. मुंबईतील मढ आयलंडसह सोलापूर, औंधेवाडी, सातारा आणि नाशिक अशा ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा कपूर पहिल्यांदाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत काम करत आहे. तमाशा क्षेत्रातील एका दिग्गज कलाकाराची संघर्षगाथा पडद्यावर मांडण्यासाठी श्रद्धाने तिचे सर्वस्व पणाला लावले आहे.

या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांच्या 'मॅडॉक फिल्म्स'ने केली आहे. श्रद्धा कपूरला एका ऐतिहासिक आणि अत्यंत गंभीर भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, सध्या पोस्ट-प्रोडक्शनचे काम वेगाने सुरू आहे. निर्माते हा चित्रपट याच वर्षाच्या अखेरीस सिनेमागृहात प्रदर्शित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shraddha Kapoor's 'Itha' Shooting Wrapped, Actress to Portray Vitabai

Web Summary : Shraddha Kapoor finished shooting for 'Itha,' directed by Laxman Utekar, based on the life of Vitabai Narayangaonkar. The movie, spanning 1940-1990, involved shooting in various Maharashtra locations. Despite an injury, Kapoor completed a grand song sequence with 800 artists. A release is expected this year.
टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडनृत्य