पहिल्यांदा पती आणि मुलांसोबत दिसली श्रद्धा कपूर उर्फ हसीना पारकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 18:01 IST
श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले असून, त्यामध्ये ती आपल्या परिवारासोबत ...
पहिल्यांदा पती आणि मुलांसोबत दिसली श्रद्धा कपूर उर्फ हसीना पारकर!
श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले असून, त्यामध्ये ती आपल्या परिवारासोबत दिसत आहे. वास्तविक आतापर्यंत चित्रपटाचा ट्रेलर आणि बरेचसे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत, परंतु पहिल्यांदाच या फोटोमध्ये श्रद्धा उर्फ हसीना पारकर पूर्ण परिवारानिशी दिसत आहे. पती आणि चार मुलांसोबत हसीना फोटोत दिसत आहे. वास्तविक श्रद्धाच एखाद्या लहान मुलीसारखी दिसते. परंतु पोस्टरमध्ये ती तब्बल चार मुलांची आई असल्याचे दाखविण्यात आले आहे, तर तिच्या पतीच्या भूमिकेत असलेला अंकुर भाटिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. या चित्रपटाचे आणखी काही ट्रेलर रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. परंतु चाहत्यांना मुख्य ट्रेलरची प्रतीक्षा आहे. रोमॅण्टिक चित्रपटांमध्ये बघावयास मिळत असलेली श्रद्धा पहिल्यांदाच अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. त्यामुळे हसीनाचा हा अंदाज प्रेक्षकांना भावणार काय? हे येत्या काळात स्पष्ट होईलच. दरम्यान, या चित्रपटाची कथा त्याकाळातील आहे, ज्यावेळी मुंबईवर अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. हसीना पारकर अंडरवर्ल्ड जगतात एक राणी होती. मुंबईच्या नागपाडा परिसरात फक्त हसीनाचाच बोलबाला होता. हसीना पारकर मोस्ट वॉँटेड दाऊद इब्राहीमची बहीण असून, त्याच्या डी कंपनीचे सूत्र ती चालवित असे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला. हसीना पारकर वास्तविक जीवनात एक पत्नी, आई आणि मुलगी होती. मात्र एका नात्यामुळे तिचे आयुष्यच बदलून गेले. पतीच्या मृत्यूनंतर हसीनाने भावाच्या गुन्हेगारी जगताचे सूत्र आपल्याकडे घेतले. त्यामुळे तिला हसीना या नावापेक्षा ‘आपा’ या नावानेच अधिक ओळखले जाऊ लागले. पुढे तर हसीनाला ‘मुंबई की क्वीन’ असेही संबोधले जाऊ लागले. चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धार्थ कपूरदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. सिद्धार्थ दाउदची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट अपूर्व लाखिया यांनी दिग्दर्शित केला असून, ८ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे.