भिकाऱ्याने अडविला शाहरूख खानचा रस्ता; व्हिडीओमध्ये पहा पुढे काय घडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 10:17 IST
सलमान खान असो की अक्षय कुमार यांनी केलेल्या मदतीचे किस्से नेहमीच ऐकावयास मिळत असतात. आता या यादीत शाहरूख खान याचेही नाव जोडले गेले आहे
भिकाऱ्याने अडविला शाहरूख खानचा रस्ता; व्हिडीओमध्ये पहा पुढे काय घडले!
जेव्हा-केव्हा बॉलिवूडकरांना गोरगरिबांची मदत करण्याची संधी मिळते तेव्हा ते लगेचच मदतीचा हात पुढे करतात. सलमान खान असो की अक्षय कुमार यांनी केलेल्या मदतीचे किस्से नेहमीच ऐकावयास मिळत असतात. आता या यादीत शाहरूख खान याचेही नाव जोडले गेले आहे. अर्थात शाहरूखने यापूर्वीदेखील चॅरिटीच्या माध्यमातून आपल्यातील सामाजिक जाणिवेची चुणूक दाखवून दिली आहे. त्याचे झाले असे की, शाहरूख खान मुंबई येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. जेव्हा तो हॉटेल बाहेर पडला अन् आपल्या कारकडे जात होता तेव्हा मध्येच एका अपंग भिकाऱ्याने वाट रोखत त्याच्याकडे जेवणाची मागणी केली. भिकाऱ्याने शाहरूखला सांगितले की, ‘तू जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेला तेव्हापासून मी तुझी वाट बघत होतो’ त्या भिकाऱ्याचे हे शब्द ऐकून शाहरूख खूपच गहिवरला. त्याने लगेचच त्याच्या डोक्यावर हात ठेवला अन् बॉडीगार्ड बोलावून त्याला पोटभर जेवण देण्याचे सांगितले. त्यानंतर शाहरूख कारमध्ये बसला अन् निघून गेला. मात्र या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ यू-ट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने हा व्हिडीओ बघितला जात असून, शाहरूखच्या या वृत्तीचे लोक कौतुक करीत आहेत. यापूर्वीदेखील अभिनेता अक्षयकुमार याच्याबरोबर असाच काहीसा प्रसंग घडला होता. अक्षयनेदेखील त्या भिकारी मुलाला हॉटेलमध्ये नेऊन पोटभर जेवण दिले होते. त्याचबरोबर त्याला नवीन कपडेही खरेदी करून दिले होते. शाहरूखचा हा दानशूरपणा सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात असून, समाजातील धनाढ्य व्यक्तींना गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.