अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) क्रिकेटचा चाहता आहे. २०२२ साली आलेल्या 'जर्सी' सिनेमात त्याने क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. तसंच २००९ मध्ये आलेल्या 'दिल बोले हडिप्पा' या रोमँटिक कॉमेडी मध्येही तो क्रिकेटरच्या भूमिकेत होता. नुकताच शाहिद इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर (Lords Cricket Ground) गेला होता. हेल्मेट, पॅड घालून तो मैदानातही उतरला. तिथले काही फोटो त्याने शेअर केले आहेत.
शाहिद कपूरने लंडनच्या लॉर्ड्स ग्राऊंडवर स्वत: क्रिकेट खेळत आनंद घेतला. त्याच्यासोबत पत्नी मीरा राजपूतही होती. सोशल मीडियावर त्याने काही फोटो पोस्ट केले आहेत. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर उभं राहून त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येतोय. त्याला जर्सीत पाहून चाहतेही खूश झालेत. शाहिदच्या दुसऱ्या फोटोत तो जर्सी, हेल्मेट, पॅड घालून मैदानावर येताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर भलताच आनंद दिसत आहे. 'व्हॉट अ डे' असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.
तर लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड या ट्विटर पेजवर शाहिद कपूर क्रिकेट खेळतानाचे काही फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत. खेळाडूंसोबत तो क्रिकेटचा आनंद घेतोय. तसंच इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीवन फीजसोबत हात मिळवतानाचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शाहिद कपूर 'देवा'मध्ये दिसला. आता तो विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागणार आहे. यामध्ये क्रिती सेनन असणार आहे. याशिवाय 'फर्जी २','कॉकटेल २', 'अर्जुन उस्तरा' हे प्रोजेक्ट्सही आहेत.