Join us

"BMW मधून फिरण्यात काय स्ट्रगल आहे?", शाहिद कपूरने स्टारकिड्सला सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:29 IST

शाहिद कपूरने स्टारकिड्सला खडे बोल सुनावले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने स्टारकिड्सच्या वागणुकीबद्दल भाष्य केलं आहे. 

बॉलिवूड म्हटलं की स्टारकिड्स हा विषय कायमच चर्चेत येतो. बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दलही अनेकदा बोललं जातं. सेलिब्रिटींकडूनही अनेकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीवरही भाष्य करण्यात आलं आहे. आता शाहिद कपूरने स्टारकिड्सला खडे बोल सुनावले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने स्टारकिड्सच्या वागणुकीबद्दल भाष्य केलं आहे. 

शाहिद हा प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक पंकज कपूर यांचा मुलगा आहे. पण, वडील प्रसिद्ध अभिनेते असूनही शाहिदने त्याची वाट स्वत: निवडली. स्टार किड असूनही शाहिदला इंडस्ट्रीत स्ट्रगल करावा लागला. याबाबतही त्याने मुलाखतीत भाष्य केलं. "सगळे म्हणतात की मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे. पण, इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्याकडे कोणतीही पॉवर नसते. फक्त मोठ्या सिनेमांमधील निर्माता, दिग्दर्शक आणि सुपरस्टारकडे पॉवर असते. तुम्ही बीएमडब्लूमध्ये बसून स्ट्रगल सुरू करता आणि नंतर मग दुसरी बीएमडब्लू घ्यायची. यात काय मजा आहे?", असं शाहिद 'नो फिल्टर विथ नेहा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

पुढे तो म्हणाला, "मी कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्याबरोबर सुरुवात केली होती. तेव्हा मी एकदम शेवटी उभा असायचो. सुपरस्टारबरोबर उभं राहणं तर सोडा मी तर माझ्या बरोबर असलेल्यांच्याही मागे उभा राहायचो. पहिल्या रांगेत येण्यासाठी मी खूप मेहनत केली. मी नेहमी पुढे जाण्यासाठी मेहनत केली या गोष्टीचा मला आनंद आहे. बीएमडब्लूमध्ये बसून स्ट्रगल करणं हा स्ट्रगल नव्हे. ट्रेनमध्ये प्रवास करणं म्हणजे स्ट्रगल आहे. माझ्या फोटोशूटचे पैसे कुठून येतील? याबाबत विचार करावा लागतो." 

शाहिदने २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'इश्क विश्क' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'विवाह', 'जब वी मेट', 'कमिने', 'उडता पंजाब', 'हैदर' या गाजलेल्या सिनेमांमध्ये तो दिसला. गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत', 'कबिर सिंग', 'जर्सी' या सिनेमांमध्ये शाहिदच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळाली. 'फर्जी' ही त्याची वेब सीरिजही प्रचंड गाजली. सध्या शाहिद देवा या सिनेमामुळे चर्चेत आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरसेलिब्रिटी