71st National Film Awards: मनोरंजन क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. यंदा बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला त्याच्या जवान सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुखला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. पण, खरं तर हा पुरस्कार त्याला स्वेदस या सिनेमासाठी मिळायला हवा होता, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
शाहरुख खानचा 'स्वदेस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. या सिनेमात शाहरुखने मोहम भार्गवा ही भूमिका साकारली होती. 'स्वदेस'मधील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. त्यामुळे त्या वर्षाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा शाहरुखलाच मिळेल, असंच सगळ्यांना वाटलं होतं. शाहरुखलाही या राष्ट्रीय पुरस्काराची अपेक्षा होती. मात्र, उलटच घडलं. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सैफ अली खानला त्याच्या हम तुम या रोमँटिक कॉमेडी सिनेमासाठी देण्यात आला होता. त्यामुळे शाहरुख प्रचंड नाराज झाला होता. आणि त्याने त्याची खंतही व्यक्त केली होती.
एका इव्हेंटमध्ये शाहरुखने ऑनस्टेज हा पुरस्कार सैफला नाही तर मला मिळायला हवा होता, असं वक्तव्य केलं होतं. हम तुमचे दिग्दर्शक कुणाल कोहली यांच्यासमोरच शाहरुख असं म्हणाला होता. "मी मनाने खूप चांगला आहे. मला प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं दिसतं. फना हा खूप सुंदर सिनेमा आहे. मला वाटतं हम तुमही चांगला चित्रपट आहे. त्या अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण, तो मला मिळायला हवा होता. तो वेगळा विषय आहे", असं शाहरुख म्हणाला होता.
दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानने व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. "ज्यांना मी राष्ट्रीय पुरस्कारसाठी योग्य वाटलो त्या सगळ्यांचे आभार मानतो. माझे दिग्दर्शक, लेखक आणि खासकरून अॅटलीने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या पुरस्काराने मला ही जाणीव करून दिली आहे की अभिनय हे केवळ एक काम नसून ती जबाबदारी आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी मी तुमचे आभार मानतो. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल भारत सरकारचेही आभार. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांसाठी समर्पित करतो", असं शाहरुखने म्हटलं आहे.