Shah Rukh Khan Reacts To Pm Modi Vantara Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने गुजरातच्या जामनगरमध्ये उभारलेल्या वन्यजीव संरक्षण केंद्र 'वनतारा'चे उद्घाटन केलं. वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी समर्पित असलेल्या या केंद्रात त्यांनी बराच वेळ घालवला. नरेंद्र मोदींनी यावेळी विविध प्रजातींच्या सिंहाच्या पिल्लांशी खेळले आणि त्यांना जवळ घेतलं. तसेच 'वनतारा' येथील प्राण्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. 'वनतारा' प्रकल्प उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या 'वनतारा' भेटीवर किंग खान शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आहे.
'वनतारा' दौऱ्यानंतर नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी 'वनतारा' येथील काही हत्तींचे फोटो पोस्ट करत मोदींनी ट्विट केलं होतं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "येथे एक हत्ती आहे, ज्याच्यावर ॲसिड हल्ला झाला. सध्या हत्तीवर उत्तम उपचार सुरु आहे. तेथे असे अनेक हत्ती आहेत, ज्यांचे मुद्दाम अंधळं करण्यात आलं आहे. दुसऱ्या एका हत्तीला भरधाव ट्रकने धडक दिलेली. यामुळे मोठे प्रश्न उपस्थित होतात. लोक इतके निष्काळजी आणि निर्दयी कसे असू शकतात? चला आपण सर्वजण या बेजबाबदारपणाचा अंत करूया आणि प्राण्यांबद्दल दया दाखवण्यावर लक्ष केंद्रित करूया".
मोदींचं हे ट्विट रिट्विट करत शाहरुख खाननं म्हटलं, "प्राणी प्रेमाच्या पात्र आहेत. त्यांचं संरक्षण आणि काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्यासाठी आणि पृथ्वीच्या संतुलनासाठी हे गरजेचं आहे. 'वनतारा' पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती याचे महत्त्व अधिक दृढ करते. एखाद्या व्यक्तीचे हृदय किती शुद्ध आहे, हे त्या व्यक्तीचं प्राण्यांवर असलेल्या प्रेमावरून कळतं. अनंतने दुर्दैवी प्राण्यांना अभयारण्य प्रदान करणे, हे याचेच एक उदाहरण आहे. बेटा, असंच काम करत राहा", असं म्हणत शाहरुखने अनंत अंबानी यांच्या कामाचं कौतुक केलं.
अनंत अंबानी यांचा 'वनतारा' रेस्क्यू सेंटर 3500 एकर जागेत पसरलेलं आहे. याठिकाणी जखमी आणि अन्य प्राण्याच्या सुरक्षेची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. देश आणि परदेशातील जखमी, शोषित प्राण्यांवर उपचार, देखभाल आणि त्यांचे पुनर्वसन केलं जातं. अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच मोठा उपक्रम आहे. जखमी प्राण्यांसाठी उत्तम आरोग्यसेवा, रुग्णालये आणि प्राण्यांवर आधारित शैक्षणिक आणि संशोधन केंद्र उभारण्याचे 'वनतारा' चे लक्ष आहे. हे कार्य भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पालन करून केली जातात.