71st National Film Awards: मनोरंजन क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. तब्बल ३३ वर्षांच्या करिअरनंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जवान 'या' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानने व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
"नमस्कार आणि आदाब, ज्यांना मी राष्ट्रीय पुरस्कारसाठी योग्य वाटलो त्या सगळ्यांचे आभार मानतो. माझे दिग्दर्शक, लेखक आणि खासकरून अॅटलीने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या पुरस्काराने मला ही जाणीव करून दिली आहे की अभिनय हे केवळ एक काम नसून ती जबाबदारी आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी मी तुमचे आभार मानतो. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल भारत सरकारचेही आभार. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांसाठी समर्पित करतो. तुम्ही पॉपकॉर्न घेऊन तयार राहा, लवकरच थिएटरमध्ये भेटू", असं म्हणत शाहरुखने सगळ्यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल चाहते आणि सेलिब्रिटींनी शाहरुखचं अभिनंदन केलं आहे. पण, किंग खानचा फ्रॅक्चर हात पाहून मात्र चाहते चिंतेत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेता लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. तसंच त्याला काळजी घेण्यासही सांगितलं आहे.
'जवान' सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात शाहरुखने दुहेरी भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याने सैन्य अधिकारी विक्रम राठोड आणि त्याचा जेलर मुलगा आजाद अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. साऊथ दिग्दर्शक अॅटली कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात दीपिका पादुकोन, नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती यांच्याही भूमिका होत्या.