Shah Rukh Khan on Jihad: जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून ( Pahalgam Terror Attack) पाच किलोमीटरवर असलेल्या बैसरन इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या हल्ल्याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. "हे कृत्य मानवतेवर काळिमा आहे मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे", अशा तीव्र शब्दांत अभिनेता शाहरुख खानने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली होती. अशातच आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. यात शाहरुख खान जिहाद शब्दाचा खरा अर्थ सांगताना दिसतोय.
एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून यात शाहरूख खान इस्लाम या धर्माबद्दल सांगताना दिसत आहे. ज्यामध्ये त्यानं 'जिहाद'ची संकल्पना स्पष्ट केली. जिहाद शब्दाचा खरा अर्थ सांगताना शाहरुख म्हणतो, "मी इस्लाम धर्माचा आहे. मी मुस्लिम आहे. इस्लाम धर्मात एक जिहाद शब्द आहे. जिहाद हा शब्द खूप चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. जिहादचा खरा अर्थ म्हणजे, आपल्यात असलेल्या वाईट विचारांविरोधात लढणे असा आहे. बाहेर रस्त्यावरील लोकांना मारणे म्हणजे जिहाद नाही". शाहरुख खानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
शाहरूख खानने गौरीसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या घरात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे पालन केले जाते. घरात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या प्रत्येक सणाला महत्त्व दिले जाते. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात गौरी खान म्हणाली होती,"शाहरुख खान धर्माबाबत रुढीवादी नाही. त्यामुळे आमच्या घरी दिवाळी, होळी, ईद असे सर्व सण जल्लोषात साजरे केले जातात. आमची मुलंदेखील हे सर्व सण धुमधडाक्यात साजरा करतात". शाहरुख आणि गौरी खान १९९१ मध्ये लग्नबंधनात अडकले. शाहरुख-गौरीचा आधी निकाह झाला असून नंतर हिंदू रितीरिवाजानुसार त्यांनी लग्न केलं. पहिल्या नजरेतच शाहरुख गौरीच्या प्रेमात पडला होता.