ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी दुपारी कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला होता. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्यांना दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता.
शबाना आझमींचे पती जावेद अख्तर अपघातग्रस्त कारमध्ये नव्हते. ते दुसऱ्या कारमधून प्रवास करत होते. जावेद अख्तर यांची कार शबाना यांच्या कारच्या मागे होती. या अपघातात शबाना यांच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. आधी त्यांना मुंबईच्या एमजीएम रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांना कोकिळाबेन धीरूबाई अंबानी रूग्णालयात हलवण्यात आले होते.
शबाना आझमी यांची तब्येत आता कशी आहे याची काळजी त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. अभिनेते-दिग्दर्शक सतिश कौशिक यांनी आयएनएसशी बोलताना सांगितले की, शबानाजी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगलीच सुधारली आहे. त्यांची तब्येत लवकरात लवकर पूर्णपणे बरी होवो यासाठी आम्ही सगळेच प्रार्थना करत आहोत.
एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. दरम्यान या प्रकरणात ट्रकच्या ड्रायव्हरने शबाना यांच्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शबाना यांचा ड्रायव्हर अमलेश कामत अतिवेगाने गाडी चालवत होता. त्याने ट्रकला धडक दिली. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप ट्रक ड्रायव्हरने केला होता.