श्रीदेवी यांचे पार्थिव पाहून विद्या बालनला अनावर झाले अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 12:23 IST
बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अख्खे कपूर कुटुंब श्रीदेवींच्या अचानक ...
श्रीदेवी यांचे पार्थिव पाहून विद्या बालनला अनावर झाले अश्रू
बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अख्खे कपूर कुटुंब श्रीदेवींच्या अचानक जाण्याने कोलमडून पडले आहे. त्यांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची ये-जा सुरू आहे. सेलिब्रेशन स्पोर्ट क्लबमध्ये श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. याठिकाणी अनेक सेलिब्रिटींनी श्रीदेवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. विद्या बालन ही श्रीदेवी यांची खूप मोठी फॅन आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तुम्हारी सुलू या चित्रपटात श्रीदेवी यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटातील हवाहवाई या गाण्यावर विद्या थिरकली होती. विद्या आपल्या या लाडक्या नायिकेला या अवस्थेत पाहूच शकत नव्हती. ती एखाद्या लहान मुलीप्रमाणे रडत होती. बोनी कपूर यांना भेटल्यानंतर तर विद्याला तिचे अश्रू अनावर झाले. विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूर तिला सावरत होते. तिची ही अवस्था पाहून सोनम कपूरने विद्याला जवळ घेतले. मंगळवारी रात्री बोनी कपूर व अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर एअरपोर्टवर उपस्थित होते. श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. Also Read : भूतकाळ विसरून अर्जुन कपूर आणि अंशुलाने दिला जान्हवी, खुशीला आधार