Join us

जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

By बाळकृष्ण परब | Updated: April 29, 2025 19:53 IST

Atul Kulkarni News: अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही काश्मीरमधील पहलगाम येथे जात भारतीय हे काश्मिरींसोबत आहेत, असा संदेश दिला होता. आता श्रीनगरमधील लाल चौकातून त्यांनी देशवासियांना एक जबरदस्त संदेश दिला आहे.

गेल्या आठवड्यात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यातच काही जणांनी या हल्ल्यासाठी स्थानिक काश्मिरींनाही दोषी ठरवत काश्मिरमधील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही काश्मीरमधील पहलगाम येथे जात भारतीय हे काश्मिरींसोबत आहेत, असा संदेश दिला होता. अतुल कुलकर्णी यांच्या या काश्मीर दौऱ्यावरून वादही झाला. तसेच त्यांच्यावर टीकाटिप्पणीही झाली. मात्र अतुल कुलकर्णी यांनी हा दौरा सुरू ठेवला. तसेच या दौऱ्यादरम्यान आता श्रीनगरमधील लाल चौकातून त्यांनी देशवासियांना एक जबरदस्त संदेश दिला आहे.

अतुल कुलकर्णी यांनी या संदर्भात सोशल मीडियावर श्रीनगरमधील लाल चौकाचा फोटो ठेवत एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, मी माझं म्हणणं मांडलं आहे. माझं मत आवडलं असेल तर त्यावर अंमलबजावणी करा. नाही आवडलं असेल तर विसरून जा. पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या हल्ल्याच्या वेदना झेलणाऱ्या अगणित लोकांप्रति संवेदना व्यक्त करतो. काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकातून या विषयावरील ही माझी शेवटची पोस्ट, असेही या पोस्टच्या अखेरीस अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लाअतुल कुलकर्णीजम्मू-काश्मीर