बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याची लेक सारा अली खानने गतवर्षी ‘केदारनाथ’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि तिच्या अदाकारीचे वारेमाप कौतुक झाले. सुशांत सिंग राजपूतसोबतची तिची जोडी पडद्यावर अशी काही जमून आली की, ‘केदारनाथ’ला प्रेक्षकांची पसंती मिळाली. यंदाचा फिल्मफेअर अवार्डही सारासाठी खास ठरला. कारण पहिल्याच चित्रपटासाठी साराने फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. ‘केदारनाथ’साठी बेस्ट अॅक्ट्रेस डेब्यूच्या अर्थात सर्वोत्कृष्ट पर्दापणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरविण्यात आले.
पहिला फिल्मफेअर जिंकल्याचा आनंद साराने आई अमृता सिंगसोबत साजरा केला. सोशल मीडियावर साराने आईसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत साराच्या हाती फिल्मफेअर पुरस्काराची बाहुली आहे तर अमृताने मागून सााराला कवटाळलेले दिसतेय. फोटोतील मायलेकींच्या चेहºयावर आनंदही बघण्यासारखा आहे. ‘फिल्मफेअर या पुरस्कारासाठी आभार. या ब्लॅकलेडीचे चुंबन घेण्याचा आनंद काही औरच आहे. टीम केदारनाथ धन्यवाद. माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आभार. जय भोलेनाथ,’ असे साराने लिहिले.