‘साहो’नंंतर प्रभूदेवाच्या चित्रपटात झळकणार ‘बाहुबली’ प्रभास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 22:16 IST
‘बाहुबली-२’ने दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याला रातोरात सुपरस्टारचा दर्जा मिळवून दिला आहे. चित्रपटात प्रभासने साकारलेला ‘बाहुबली’ आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य ...
‘साहो’नंंतर प्रभूदेवाच्या चित्रपटात झळकणार ‘बाहुबली’ प्रभास!!
‘बाहुबली-२’ने दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याला रातोरात सुपरस्टारचा दर्जा मिळवून दिला आहे. चित्रपटात प्रभासने साकारलेला ‘बाहुबली’ आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरच नव्हे तर जगभरात धूम उडवून देत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. शिवाय प्रभासला स्टारडम मिळवून दिले आहे. सध्या प्रभासचे चलन जोरात असून, तो ‘बाहुबली’नंतर कोणकोत्या चित्रपटांमध्ये झळकेल यावर खरपूस चर्चा रंगत आहे. ‘बाहुबली’नंतर तो ‘साहो’मध्ये दिसणार हे निश्चित असले तरी, तो आणखी कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये झळकेल याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आता आलेल्या माहितीनुसार प्रभास ‘साहो’मध्ये व्यस्त असतानाच प्रभूदेवाच्या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. वास्तविक प्रभास दाक्षिणात्य चित्रपटाबरोबरच हिंदीमध्ये केव्हा झळकेल याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते त्याच्या प्रत्येक हिंदी चित्रपटावर निर्माण होणाºया चर्चांवर लक्ष ठेवून आहेत. आता आलेल्या माहितीनुसार प्रभास ‘साहो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही प्रभूदेवाच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. डेक्कन क्रॉनिकलशी बोलताना प्रभूदेवाने सांगितले की, ‘प्रभास माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्याला तेव्हापासून ओळखतो जेव्हा त्याने तामिळ, तेलगू चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले होते. एवढेच काय तर त्याने माझा हिंदी चित्रपट ‘अॅक्शन जॅक्सन’मध्येही कॅमिओ केला होता. त्यामुळे मला त्याच्यासोबत चित्रपट बनविण्याची तीव्र इच्छा आहे. माझ्यातील ही इच्छा ‘बाहुबली’ने केलेल्या अफाट बिझिनेसमुळे निर्माण झालेली नाही. जर चित्रपट केवळ पैशांसाठीच बनविला जात असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. सध्या प्रभास त्याच्या तेलगू ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. त्यानंतर आम्ही आमच्या चित्रपटाला सुरुवात करणार आहोत.’ याचा अर्थ सध्या प्रभासकडे चित्रपटांची भली मोठी लाइन असून, आगामी काळात तो कोणकोणत्या चित्रपटांमध्ये झळकेल हे बघणे त्याच्या चाहत्यांना मजेशीर ठरेल. सध्या बहुतांश निर्माते त्याच्या ‘साहो’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. कारण तो या चित्रपटातून काहीसा फ्री झाल्यानंतर त्याच्याशी अनेक निर्माते करारबद्ध होण्यास उत्सुक आहेत. दरम्यान ‘साहो’मध्ये प्रभास अतिशय डॅशिंंग अशा अंदाजात बघावयास मिळणार असून, त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर ‘बाहुबली-२’च्या रिलीजबरोबरच रिलीज करण्यात आला होता.