Join us

​संजय दत्तच्या एका फॅनने आपली संपत्ती केली संजयच्या नावावर, मृत्यूपत्रात वारस म्हणून लिहिले संजयचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 11:40 IST

मुंबईतील मलबार हिल येथे राहाणाऱ्या निशी त्रिपाठी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काहीच दिवसांत त्यांचे मृत्यूपत्र कुटुंबाला वाचून ...

मुंबईतील मलबार हिल येथे राहाणाऱ्या निशी त्रिपाठी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काहीच दिवसांत त्यांचे मृत्यूपत्र कुटुंबाला वाचून दाखवण्यात आले. या मृत्युपत्राचे वाचन केल्यानंतर त्रिपाठी कुटुंबातील मंडळींना चांगलाच धक्का बसला. कारण निशी त्रिपाठी यांनी आपली संपत्ती कुटुंबियांच्या नावावर न करता संजय दत्तच्या नावावर केली होती. मुंबई मिरर या वर्तमानपत्राने याबाबत बातमी दिली आहे. निशी त्रिपाठी यांचे बँक ऑफ बरोदाच्या वाळकेश्वर शाखेत अकाऊंट असल्याने या शाखेने संजय दत्त यांना संपर्क साधून याबाबत कळवले. २९ जानेवारीला संजय दत्तला फोन करून कळवण्यात आले की, निशी त्रिपाठी या महिलेचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले असून त्यांनी त्यांच्या अकाऊंटमधील पैसे आणि लॉकरमधील वस्तू या संजय दत्त यांना देण्याचे मृत्यूपत्रात लिहिले आहे. हे सगळे ऐकून त्रिपाठी कुटुंबियांप्रमाणे संजय दत्तला देखील चांगलाच धक्का बसला होता. आपली एखादी फॅन आपल्यासाठी इतके करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. निशीच्या पैशात संजय दत्तला काहीही रस नसल्याने त्याने आपल्या वकिलांकडून बँकेला कळवले की, निशी त्रिपाठी यांनी ठेवलेले पैसे मला न देता त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावेत. निशी त्रिपाठी या गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होत्या. त्या संजय दत्त यांच्या फॅन होत्या. त्यांच्या पश्चात आई आणि तीन भावंडं आहेत. त्या आपल्या कुटुंबीयांसोबत मलबार हिलमधील थ्री बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहात होत्या. त्या फ्लॅटची किंमत करोडोमध्ये आहे. गिरगाव येथील भारतीय विद्या भवन येथे निशी त्रिपाठी यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रार्थना सभेच्या दुसऱ्या दिवशी निशी त्रिपाठी यांच्या वकिलाने मृत्युपत्राविषयी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. बँकेनुसार मृत्यूच्या काहीच महिन्याआधी निशी त्रिपाठी यांनी आपल्या वारसदाराबद्दलचे पत्र बँकेला दिले होते. या पत्रात वारसदारच्या नावाच्या येथे फिल्म स्टार संजय दत्त असा उल्लेख करण्यात आला होता आणि पत्त्याच्या रखाण्यात संजय दत्तच्या पाली हिलमधील घराचा पत्ता देण्यात आला होता. Also Read : संजय दत्तच्या बायोपिकने रिलीज आधीच कमावले तब्बल 110 कोटी !