Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजूबाबाने केला ड्रग्जच्या नशेबाबत खुलासा, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 10:37 IST

सध्याच्या लॉकडाऊनमध्ये संजय दत्तचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तच्या जीवनातील चढउतार 2018 साली रिलीज झालेल्या बायोपिकमध्ये पहायला मिळालं. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती. रणबीरच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली होती. यासोबतच संजय दत्तच्या आयुष्याबद्दल न माहित असलेले खुलासेदेखील या चित्रपटात पहायला मिळाले. दरम्यान सध्या लॉकडाऊनच्या काळात संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यानं आपल्या ड्रग्सच्या नशेबाबत आतापर्यंत सर्वात मोठा खुलासा केला आहे.

सध्याच्या लॉकडाऊनमध्ये संजय दत्तचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. संजयचा हा व्हिडीओ विरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. जो चंदीगढ युनिव्हर्सिटीमध्ये संजय दत्तनं दिलेल्या एका स्पीचची क्लिप आहे.

या व्हिडीओमध्ये संजय दत्त त्याच्या ड्रग्सच्या नशेबद्दल सांगताना दिसत आहे. संजय सांगतो, 'सकाळची वेळ होती आणि मला खूप भूक लागली होती. त्यावेळी माझ्या आईचे निधन झाले होते. मी आमच्या नोकराला सांगितले की मला खायला काहीतरी दे. त्यावर तो म्हणाला, बाबा तुम्ही दोन दिवसांपासून काहीही खाल्लेले नाही. फक्त झोपून होतात. मी बाथरुममध्ये गेलो होतो. मी तुम्हाला पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी मरणाच्या अवस्थेत पडलेले होता. तुमच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होतं.'

संजय पुढे सांगतो, मी नोकराचं सर्व बोलणं ऐकलं आणि घाबरुन गेलो आणि सकाळी 7 वाजता मी माझ्या वडीलांकडे गेलो. त्यांना म्हटले मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला ड्रग्सची नशा करायची सवय झाली आहे. मी खूप भाग्यवान आहे की, माझ्या वडीलांनी माझी मदत केली. त्यांनी मला अमेरिकेतील एका पुनर्वसन केंद्रात दाखल केले. त्याठिकाणी मी 2 वर्षं घालवली. सुरुवातीच्या काही दिवसांत माझ्या डोक्यात पुन्हा एकदा ट्राय करावं का असे विचार येत होते. मात्र नंतर मी स्वतःवर कंट्रोल करायला शिकलो.

संजय दत्तने पुढे सांगितलं, जेव्हा मी अमेरिकेतून परत आलो. त्यावेळी माझा जुना ड्रग्स पेडलर पुन्हा मला भेटायला आला. मला माझ्या नोकराने सांगितले. तुम्हाला कोणतरी भेटायला आले आहे. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. त्यावेळी मी पाहिले तर तो ड्रग्स पेडलर होता. त्याने ड्रग्स माझ्या हातात दिले आणि म्हणाला बाबा हा नवा माल आहे तुझ्यासाठी आणला आहे. तो एक क्षण होता ज्यावेळी माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा होता. मी माझ्या वडीलांना ड्रग्स न घेण्याचे वचन दिले होते आणि मी ते पाळले.

टॅग्स :संजय दत्त