Join us
Daily Top 2Weekly Top 5

मला नोकरी सोडावी लागली... !  वर्षभरानंतरही बॉयफ्रेन्डच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकली नाही संजय दत्तची मुलगी त्रिशाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 15:02 IST

भावूक पोस्ट... बॉयफ्रेन्डच्या अनपेक्षित मृत्यूने त्रिशाला कमालीची  खचली होती. वर्षभरानंतरही ती यातून सावरू शकलेली नाही.

ठळक मुद्देत्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे.

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 2 जुलैला संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. बॉयफ्रेन्डच्या अनपेक्षित मृत्यूने त्रिशाला कमालीची  खचली होती. वर्षभरानंतरही ती यातून सावरू शकलेली नाही. गत २ जुलैला त्रिशालाच्या इटालियन बॉयफ्रेन्डचे अकाली निधन झाले. या घटनेनंतर त्रिशालाला स्वत:ला सावरणे कठीण जातेय.  आज बॉयफ्रेन्डच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिने एक भावूक पोस्ट लिहिली.

तिने लिहिले, ‘माझ्या पायाखालची जमिन सरकली होती, त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. आता माझे आयुष्य पूर्णत: बदलले आहे. गेल्या वर्षभरापासून मी जवळजवळ सोशल मीडियापासून दूर होते. आठ वर्षांच्या वयात आईला गमावणे आणि त्यानंतर दोन दशकांपेक्षाही अधिक काळ त्यातून सावरण्याचा प्रयत्न करणे. निश्चितपणे त्या सुंदर आत्म्याला मला गमवायचे नव्हते. ही केवळ काळासोबत बदलण्यासारखी गोष्ट नाही. आयुष्यातील या दु:खद क्षणांचा सामना तुम्हाला करावा लागतो. भावनांचा रोलरकोस्टर झेलावा लागतो. गेल्या वर्षभरात मी खूप रडले आणि नंतर या अश्रूंपासून दूर पळून जाण्याचेही प्रयत्न केलेत. तू या जगातून गेल्यानंतर मला नोकरी सोडावी लागली. कारण  माझीच स्थिती चांगली नसताना मी कुणाच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घेणार? अनेकदा लोकांपुढे माझा धीर खचला. मला मदत हवी का, असे लोकांनी मला विचारले. वर्षभरात मी प्रत्येक गोष्ट खाल्ली, माझे वजन 13 किलो वाढले. असो, ठीक आहे. असे काहीही नाही जे मी ठीक करू शकणार नाही. त्याच्या अनेक आठवणी माझ्याजवळ आहेत. त्याचे टेक्स्ट मैसेज, नोट्स, त्याचा टूथब्रश, त्याची आवडती गाणी, त्याचे टी-शर्ट. तो खूप सुंदर व्यक्ति होता. मला तो सतत हसवायचा. मदतीसाठी तत्पर असणारा, चांगला श्रोता होता. त्याला माझ्यावर विश्वास होता. माझी तो प्रचंड काळजी घ्यायचा. माझा आदर करायचा. त्याने कधीच मला जज केले नाही. त्याच्या कुटुंबानेही माझे स्वागत केले. त्याच्या आयुष्याचा भाग बनणे आनंदाची गोष्ट होती. तो कायम माझ्या आयुष्याचा भाग राहिल आणि माझ्या कहाणीचाही. मी त्याच्याशिवाय अपूर्ण आहे पण तो काही क्षणांसाठी माझ्यासोबत होता, यासाठी मी जगातील सर्वात नशीबबानही आहे.’ ही पोस्ट वाचल्यानंतर त्रिशाला अद्यापही बॉयफ्रेन्डच्या मृत्यूच्या दु:खातून सावरलेली नाही, हे स्पष्ट दिसते.

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे. २०१४ मध्ये तिने पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइन सुरू केली होती. न्युयॉर्कमधील जॉन जे कॉलेज आॅफ क्रिमिनल जस्टिसमध्ये तिने कायद्याची पदवी घेतलीय.

१९८७ मध्ये संजय दत्तने ऋचा शर्मासोबत लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला. ऋचा ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याने १० डिसेंबर १९९६ मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यूयॉर्कमध्ये मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्त नेहमी तिच्या संपर्कात असून, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. याशिवाय संजय दत्तची पत्नी मान्यतासोबतही तिचे चांगले संबंध आहेत.

टॅग्स :संजय दत्त