Join us

मॉडेलसोबत फोटोशूटपासून सुरू झालेला वाद घटस्फोटापर्यंत! सानिया म्हणते- Divorce घेणं कठीण, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 16:58 IST

सानिया आणि शोएब घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या चर्चांदरम्यानच सानियाने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सानिया आणि शोएबमध्ये बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच सानियाने इन्स्टाग्रामवरुन शोएबबरोबरचे सर्व फोटो डिलीट केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सानिया आणि शोएब घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या चर्चांदरम्यानच सानियाने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

सानिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती वैयक्तिक जीवनातील अपडेट्सही सोशल मीडियावरुन शेअर करते. सध्या सानियाच्या एका पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. "लग्न करणं कठीण, घटस्फोट घेणं कठीण. लठ्ठपणा कठीण आहे तर फिट राहणंही कठीण आहे. कर्जात डुबणं कठीण...आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणं कठीण. संवाद साधणं कठीण आहे. तर संवाद न साधणंही तितकंच कठीण...एका कठीण गोष्टीची निवड करावी लागते. आयुष्य कधीच सोपं नसतं. ते नेहमीच कठीण असतं. पण, आपल्याला कठीण गोष्टीची निवड करावी लागते. त्यामुळे योग्य निवड करा," असं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

सानिया आणि शोएबमध्ये नेमका वाद काय?

पाकिस्तानी क्रिकेटर असलेल्या शोएब मलिकने आयेशा उमर या पाकिस्तानी मॉडेलसोबत फोटोशूट केलं होतं. त्यांचे स्विमिंगपूलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शोएब आणि आयेशामध्ये अफेअर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं. पण, त्यानंतर सानिया आणि शोएबने एकत्र रिएलिटी शोमध्ये हजेरी लावत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. 

पण, आता पुन्हा त्यांच्यात बिनसलं असून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.  शोएब आणि सानियाला 11 वर्षांचा इजहान हा मुलगा आहे. सध्या सानिया तिच्या मुलासोबत भारतात आहे. सानिया किंवा शोएब यापैकी कोणीही अद्याप घटस्फोटाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकसेलिब्रिटीऑफ द फिल्ड