सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खाननेही (Salman Khan) कुटुंबासोबत बाप्पाची आरती करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर आता नुकतंच त्याने सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या बांद्रा सार्वजनिक गणेशमंडळातील गणरायाचे दर्शन घेतले. कारमधून उतरुन तो अनवाणी पळतच शेलार यांच्या घरी गेला. त्याच्या मागे सुरक्षारक्षकही पळत गेले. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सलमान खान काल रात्री मंत्री आशिष शेलार यांच्या बांद्रा येथील सार्वजनिक गणेशमंडळात पोहोचला बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला. चेक्स शर्ट,जीन्समध्ये तो नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत होता. शेलार यांच्या घरी बाप्पाचं दर्शन केल्यानंतर त्याने प्रसाद घेतला आणि टीकाही लावला. सलमानसोबत झेट प्लस सुरक्षा आणि गाड्यांचा ताफा होता. कारमधून उतरताच तो अनवाणीच शेलार यांच्या घरी गेला आणि पळत पळतच बाहेर आला. त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी पापाराझींची गर्दी झाली होती.
आशिष शेलार यांनीही सलमानचे फोटो शेअर केले आहेत. 'अभिनेते सलमान खान यांनी आमच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले' असं कॅप्शन त्यांनी दिले आहे.
व्हिडिओखालील कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी सलमानचं कौतुक केलं आहे. 'सलमान प्रत्येक धर्माचं पालन करतो','सलमान हिंदूंपेक्षाही जास्त हिंदू वाटतो','लॉरेन्स बिश्नोईपासून सांभाळून राहा' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत. सलमान आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. या सिनेमासाठी त्याने फिटनेसवर जास्त लक्ष दिलं आहे. काहीच दिवसात त्याने कमालीचं वजन घटवलं आहे.