सलमान खान त्याच्या 'सिकंदर' सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना दुसरीकडे मात्र 'सिकंदर' फेम अभिनेता अडचणीत सापडला आहे. 'सिकंदर'मधील अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याकडे कोटींचे ड्रग्ज सापडल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
'सिकंदर'मध्ये खलनायकाची भूमिका साकारलेल्या अभिनेता विक्टर ओडिचिन्मा ओनुवालाकडे ड्रग्ज सापडले आहेत. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. वसईच्या क्राइम ब्रांच युनिट २कडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडे तब्बल ११ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज आढळल्यानंतर क्राइम ब्रांच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
विक्टर ओडिचिन्मा ओनुवाला हा मुळचा नायजिरायचा नागरिक आहे. त्याने काही मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अनुपमा, सीआयडीसारख्या मालिकांमध्ये तो व्हिलनच्या भूमिकेत दिसला होता. विक्टर वसई पूर्व येथील महेश अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे.
गेल्या एक महिन्यापासून क्राइम ब्रांच त्याच्यावर नजर ठेवून होती. विक्टर इंडस्ट्रीतील लोकांनाही ड्रग्ज पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्याकडे एक नकली पासपोर्टही सापडला आहे. क्राइम ब्रांचने विक्टरकडून २२.८६५ किलो एमडी ड्रग्ज आणि ४८ ग्रॅम कोकीन जप्त केलं आहे. ज्याची किंमत सुमारे ११.५८ कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.