Join us

‘त्या’ चर्चेने चित्रपटगृहांचे मालक हवालदिल, भाईजान सलमानला लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 17:03 IST

भाईजानला केली ही विनंती...

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृह क्षेत्र अडचणींचा सामना करीत असून या क्षेत्राला मदतीचा हात द्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सुपरस्टार सलमान खानची सोशल मीडिया  फॉलोइंग जबरदस्त आहे. एकट्या इंस्टाग्रामवर त्याला साडे तीन कोटी लोक फॉलो करतात. त्याच्या नावाचे अनेक फॅन पेज आहेत, यावर सलमानशी संबंधित बित्तंबातमी शेअर होते. तूर्तास सलमानच्या ‘राधे’ याआगामी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. कारण काय तर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार, अशी बातमी. पण आता हा सिनेमा ओटीटीवर नाही तर चित्रपटगृहांत रिलीज व्हावा, अशी  मागणी चित्रपटगृहांच्या मालकांनी केली आहे. या मालकांनी सलमानला पत्र लिहून तशी आग्रही मागणी केली आहे.

कोरोनामुळे ‘राधे’ आधीच रखडला. आता चित्रपटगृह अनलॉक झालेत. पण अद्यापही प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद नाही. या पार्श्वभूमीवर नफ्यासाठी मेकर्सनी ‘राधे’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याच्या हालचाली सुरु केल्याचे कळतेय. चित्रपटगृहांचे मालक मात्र या बातमीने हवालदिल झाले आहेत. त्यामुळेच  ‘राधे’ हा केवळ सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित करावा, अशी विनंती करणारे पत्र चित्रपट प्रदर्शन संघटनेने सलमान खान याला लिहिले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृह क्षेत्र अडचणींचा सामना करीत असून या क्षेत्राला मदतीचा हात द्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

 ‘प्रिय सलमान खान, आशा आहे की या पत्रातून आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला माहिती आहेच की 2020 हे वर्ष कोट्यावधी देशवासीयांसह भारतीय चित्रपटांसाठी देखील अडचणींचे वर्ष ठरले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सिंगल स्क्रीन किंवा मल्टीप्लेक्सबंद असल्याने त्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लाखो कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे.  एखाद्या वाहनासाठी इंधन गरजेचे असते तसेच चित्रपटगृहांसाठी चित्रपट. त्यामुळे सातत्याने चित्रपट प्रदर्शित झाले नाही तर सिनेमागृहे चालवणे अशक्य आहे. राधे या सिनेमाने चित्रपटगृहांना नवसंजीवनी मिळू शकते. तेव्हा आम्ही विनंती करतो, की हा सिनेमा ईदच्या मुहूर्ताला केवळ सिनेमागृहांत प्रदर्शित करावा. यापेक्षा ईदी आम्हाला अन्य काहीही असू शकत नाही,’ असे या पत्रात म्हटले आहे.उत्तराखंड, आसाम, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, बिहार, तेलंगणा, दिल्ली, डेहराडून आणि हैद्राबाद येथील संघटनांच्या या पत्रावर सह्या आहेत. 

प्रदर्शनाआधीच पैसे वसूल, इतक्या कोटीत विकले सलमानच्या ‘राधे’चे हक्क!!

टॅग्स :सलमान खान