Join us

"दहा पावलं मागे जा.."; सलमानने मोठ्या आवाजात पापाराझींना दिला इशारा, असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:58 IST

सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो मीडियावर चांगलाच रागावलेला दिसतोय. काय घडलं नेमकं?

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो. अलीकडेच तो लहान भाची आयत शर्मासोबत मुंबईतल्या एका कार्यक्रमाला दिसला. यावेळीचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सलमानने दाखवलेली भाचीवरील काळजी आणि प्रेम पाहून चाहते भारावले आहेत. कार्यक्रमस्थळी पापाराझी आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. सलमान आपल्या भाचीसोबत आत जाण्याचा प्रयत्न करत असताना फोटोग्राफर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो घेत होते. त्यावेळी सलमानने काय केलं बघा

सलमान पापाराझींना ओरडला

सलमान आणि त्याची भाची आयतचा व्हिडीओ काढण्यासाठी पापाराझींचा गोंधळ सुरु होता. छोटी आयत मामा सलमानता हात धरुन चालत होती. त्यावेळी सलमान थोड्या कठोर आणि मोठ्या आवाजात सर्वांना म्हणाला, “दहा पावलं मागे जा, माझ्यासोबत छोटी मुलगी आहे.” सलमानने पापाराझींना आणि गर्दीला स्पष्ट सांगितले की लहान मुलाच्या सुरक्षिततेसाठी थोडं अंतर राखणं गरजेचं आहे.

व्हिडिओमध्ये आयत थोडी घाबरलेली आणि गोंधळलेली दिसत होती. ती सलमानचा हात घट्ट धरून उभी होती. हे पाहून सलमानने तिला उचलून घेतले आणि सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळी नेले. हा क्षण पाहून लोकांना सलमानचा प्रेमळ आणि काळजीवाहू स्वभाव अधिकच भावला. सोशल मीडियावर या घटनेवर भरपूर प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी सलमानला “बेस्ट मामा” म्हटले. चाहत्यांनी लिहिले की, गर्दीत सलमानने ज्या पद्धतीने भाचीचं रक्षण केलं, ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्माची मुलगी आयत ही त्याची लाडकी भाची आहे. यापूर्वीही तो तिच्यासोबत खेळताना किंवा कार्यक्रमांना जाताना दिसला आहे. पण यावेळचा हा प्रसंग चाहत्यांच्या मनाला विशेष भिडला आहे. सलमान लवकरच आपल्याला 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खानअर्पिता खानबॉलिवूडटेलिव्हिजन