बॉलिवूडचा दबंग खान सलमान सध्या बॅक-टू-बॅक बिग बजेट चित्रपटांच्या तयारीत आहे. 'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदान्नासोबत काम केल्यानंतर आता सलमान खान आणखी दोन दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. या दोन दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि समांथा असल्याचं बोललं जात आहे.
२०२३ मध्ये 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे नयनताराने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटानंतर तिने कोणताही हिंदी चित्रपट स्वीकारण्याची घाई केली नव्हती. मात्र, आता ती सलमान खानसोबत एका पॅन इंडिया (Pan-India) चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. 'मिड-डे'च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात सलमान आणि नयनताराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना दिसेल.
या भव्य चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक वामशी पैदिपल्ली करणार असून, दिल राजू यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत हा चित्रपट साकारला जाणार आहे. वामशी पैदिपल्ली यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असेल. विशेष म्हणजे, या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत असू शकते, अशी चर्चा आहे.
'बॅटल ऑफ गलवान'नंतर सुरू होणार शुटिंगसलमान खान सध्या त्याच्या 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे काम पूर्ण होताच तो नयनतारासोबतच्या या नवीन पॅन इंडिया चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटाचा भाग असणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.