Join us

Saif Ali Khan : सैफच्या आधी शाहरुख होता निशाण्यावर? आरोपीकडून मन्नत बंगल्यातही रेकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:51 IST

शाहरुखचा मन्नत देखील हल्लेखोराच्या निशाण्यावर होता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली  आहे.  या हल्ल्यात सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. मात्र, या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अशातच सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी हल्लेखोराने किंग खान शाहरुखच्या मन्नत बंगल्याची रेकी केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.  सैफ-करीना कपूरच्या घराच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोराची काल ओळख पटवण्यात आली. पोलिस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करत आहेत. सैफच्या आधी अभिनेता शाहरुख खान याच्या घराचीही (Shah Rukh Khan Mannat ) 14 जानेवारीला रिट्रीट हाऊसजवळून रेकी झाली असं बोललं जात आहे. रिट्रीट हाऊस हे शाहरुखच्या मन्नत बंगल्यामागेच आहे. येथे सीढी लावून आरोपीनं रेकी केल्याचं वृत्त मुंबई तकने दिलंय.

तर दुसरीकडे मात्र नवभारत टाईम्सनुसार, शाहरुखच्या घराची रेकी केल्याच्या मुंबई पोलिसांनी या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. या निव्वळ अफवा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, या प्रकरामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न आता विचारले जात आहे.  वांद्रे परिसरात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि सर्वसामान्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  एवढी कडेकोट सुरक्षा असून सुद्धा चोर घरात घुसून एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीवर हल्ला करू शकतो ही फारच गंभीर बाब आहे. 

 

टॅग्स :सैफ अली खान शाहरुख खानसेलिब्रिटीमुंबई पोलीस