बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला असून सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेता कधी आणि किती वाजता रुग्णालयात पोहोचला, त्याची प्रकृती कशी आहे, याबद्दल रुग्णालयाने निवेदन जारी करून अपडेट दिले आहे.
लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरी एका अज्ञात व्यक्तीने भोसकले आणि त्याला पहाटे ३.३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफवर ६ वेळा वार करण्यात आले आहेत. यातील दोन खोल जखमा आहेत. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. तर दुसरी मानेजवळ झाली आहे. या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर, डाव्या मनगटावर आणि छातीवर जखमा झाल्या आहेत. अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्येही चाकूचा एक छोटासा भाग अडकला आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने ऑपरेशनची गरज होती. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, एनेस्थेटियोलॉजिस्ट डॉ. निशा गांधी आणि डॉ. उत्तमानी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहे.
नेमकं काय घडलं?सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी रात्री अडीच वाजता चोर शिरल्याचे लक्षात आले. घरातील मोलकरणीचा त्याच्याशी वाद सुरू होता. तिचा आवाज ऐकून सैफ तिथे आला आणि त्याची चोरासोबत झटापट झाली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने अभिनेत्यावर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आहे. यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
पोलीस काय म्हणालेसैफच्या मोलकरणीच्या हाताला दुखापत झाली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. सैफच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीसीटीव्हीमध्ये प्रवेश दिसत नाही. ती व्यक्ती घरात कशी घुसली याचा शोध घेण्यासाठी पोलिस सैफच्या घरी आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अभिनेत्याच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. घरात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी या चार जणांना ताब्यात घेतलं आहे, त्याचबरोबर त्यांचे फोन देखील ताब्यात घेतले आहे.