Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खानच्या हल्लेखोराचा जामिनासाठी कोर्टात अर्ज, केला नवा दावा, कधी होणार सुनावणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:20 IST

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीने जामीन अर्जात नवा दावा केला आहे.

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काही महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. मध्यरात्री घरात घुसलेल्या चोराने सैफवर चाकूहल्ला केला होता. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. सैफवर चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली  बांगलादेशी नागरिक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीने आता जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.या अर्जात त्यानं आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा केला आहे.

आरोपीच्या जामिन अर्जावर काल सुनावणी होणार होती. पण, पोलिसांकडून आरोपपत्र दाखल न झाल्यामुळे न्यायालयानं या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी पुढील तारीख ४ एप्रिल दिली आहे. त्यामुळे ४ एप्रिलला आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरू आहे आणि पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर ते सत्र न्यायालयात हस्तांतरित होण्याची अपेक्षा आहे. वांद्रे पोलिसांनी अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही.

जामीन अर्जात काय म्हटलंय?

शहजादने आपल्या वकिलाच्या माध्यमातून हा दावा केला की, आता आणखी कोठडीत ठेवून काहीही साध्य होणार नाही. तपासात पूर्ण सहकार्य केले आहे आणि सर्व आवश्यक पुरावे आधीच पोलिसांकडे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे कठीण आहे.

शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी नागरिक 

शरीफुल इस्लाम शहजादकडून पोलिसांनी बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले होते. तो विजय दास या नावाने मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. आरोपी पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होता आणि घरकामाचे काम करत होता.

टॅग्स :सैफ अली खान