Join us

सागरिका घाटगेने युवराज सिंगसोबत मॅचिंग ड्रेसमध्ये फोटो काढल्याने पत्नी हेजल झाली नाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 20:19 IST

विरूष्काच्या मुंबई येथील रिसेप्शन सोहळ्यात युवराज सिंग अन् सागरिका घाटगेने काढलेले फोटो सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या मंगळवारी मुंबई येथे त्यांच्या लग्नाच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील दिग्गज उपस्थित होते. मुंबईतील लोअर परेल स्थित सेंट रेगिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा रंगला होता. या सोहळ्यात बरेचसे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक फोटो क्रिकेटपटू युवराज सिंगचा असून, इन्स्टाग्राम तो चांगलाच पसंत केला जात आहे. परंतु या फोटोमुळे त्याची पत्नी हेजर कीच नाराज असल्याचे समजते.  त्याचे झाले असे की, माजी क्रिकेटपटू जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे विरूष्काच्या रिसेप्शनला पोहोचले होते. यावेळी सागरिकाने युवराजसोबत काही फोटो काढले. त्यातील एक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. परंतु या फोटोला हेजलने असे एक कॉमेण्ट दिले ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. रिसेप्शनमध्ये युवराजने मरून रंगाचा कुर्ता घातला होता, तर सागरिकाने त्याच रंगाचे कपडे परिधान केले होते. दोघांनी याच अवतारात एकत्र फोटोशूट केले. विशेष म्हणजे हे फोटो स्वत: जहीरने काढले. पुढे हा फोटो सागरिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना लिहिले की, ‘मिस्टर सिंगसोबत चांगला ताळमेळ, हेजल कीच तुझी आठवण येत आहे’ या फोटोनंतर हेजलनेदेखील काहीशा अशाच अंदाजात कॉमेण्ट देताना लिहिले की, ‘मला असे वाटते की, मलादेखील ताळमेळ साधण्यासाठी जहीर खानसोबत असाच मॅचिंग ड्रेस परिधान करायला हवा’ हेजलच्या या कॉमेण्टनंतर या फोटोला सातत्याने नेटिझन्सकडून कॉमेण्ट दिल्या जात आहेत. अर्थात या सर्व कॉमेण्ट मजेशीर आहेत. दरम्यान, युवराज पत्नी हेजरविनाच विरूष्काच्या रिसेप्शन पार्टीत सहभाग झाला होता. ११ डिसेंबर रोजी विरूष्काने इटली येथे लग्न केल्यानंतर सुरुवातीला दिल्ली अन् त्यानंतर मुंबईत रिसेप्शन दिले होते. या दोन्ही रिसेप्शन सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती, तर मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यात क्रिकेट जगतासह, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. महानायक अमिताभ बच्चन यांची उपस्थिती लक्षणीय ठरली होती.