Join us
Daily Top 2Weekly Top 5

'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:32 IST

एका सिनेमात धरमजींना दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली होती, सचिन पिळगावकरांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचं काल वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. सर्वात देखणे हिरो, अतिशय प्रेमळ म्हणून ते प्रसिद्ध होते. अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि अख्खी इंडस्ट्री धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाली आहे. प्रत्येक जण त्यांच्या आठवणी शेअर करत आहेत. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही धर्मेंद्र यांच्यासोबत अनेकदा काम केलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर काल सचिन पिळगावकरांनी भावुक पोस्ट शेअर केली होती. नंतर ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, "धरम पाजी अतिशय देखणे अभिनेते तर होतेच पण अतिशय नम्रही होते. मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम केलं तेव्हा मी ९ वर्षांचा होतो. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'मझली दीदी'या १९६७ साली आलेल्या सिनेमात धरमजी होते. तर त्यांच्या पत्नीची भूमिका मीना कुमारी यांनी केली होती. मी मीना कुमारींच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत होतो. हृषिकेश मुखर्जींना धरमजी कधीच नाही म्हणायचे नाहीत म्हणूनच त्यांनी इतका मर्यादित महत्व असलेली ही भूमिकाही स्वीकारली होती. इतका हँडसम माणूस सेटवर पाहून मी तर भारावून गेलो होतो.फक्त सहकलाकारांशीच नाही तर सेटवरील प्रत्येक टेक्निशियनशीही ते खूप प्रेमाने आणि आदराने बोलायचे."

ते पुढे म्हणाले, "१९७४ साली आलेल्या 'रेशम की डोरी' मध्ये मी धरमजींच्या बालपणीची भूमिका केली होती. नंतर 'शोले'मध्ये काम केलं. 'दिल का हीरा' सिनेमात धरमजींनी कस्टम ऑफिसरची भूमिका केली होती आणि मी त्यांचा लहान भाऊ होतो. तोपर्यंत आमची छान ओळख झाली होती. 'क्रोधी' सिनेमातही आम्ही स्क्रीन शेअर केली. काही वर्षांनंतर 'आजमायिश' सिनेमा मी दिग्दर्शित केला ज्यात धरमजी होते. दिग्दर्शक म्हणून मला माझे सगळेच कलाकार आवडतात पण धरमजींना दिग्दर्शित करणं माझ्यासाठी खूपच खास होतं."

'यमला पगला दीवाना' नावाचा किस्सा

सचिन पिळगावकर म्हणाले,"मला नव्वदीतला आणखी एक किस्सा आठवतो. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन(IMPPA)कडे मी 'यमला पगला दीवाना' टायटलची नोंद केली होती. एक दिवस मला एका निर्मात्याचा फोन आला. त्याने हे टायटल मला मागितलं. मी नकार दिला. काही दिवसांनी धरमजींनी मला फोन केला. ते खूपच प्रेमाने, अदबीने बोलत होते. मग मला म्हणाले, 'सचिन, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तुमच्याकडे यमला पगला दीवाना टायटल आहे ना?' तेव्हा मी म्हणालो, 'नाही, माझ्याकडे नाही'. धरमजी हसले आणि म्हणाले, 'पण निर्मात्यांनी मला तुम्ही नकार दिल्याचं सांगितलं'. मी म्हणालो, 'ते टायटल माझ्याकडे होतं जोपर्यंत तुमचा फोन आला नाही. आता ते शीर्षक माझं राहिलं नाही ते तुमचं झालं आहे.' मी त्यांना आणखी काही हवंय का विचारलं. कारण माणसाने भारतीय सिनेसृष्टीत इतकं मोठं योगदान दिलं आहे त्यांना मी काय देणार? त्यांचा वारसा कायमच उंचावर राहील."

English
हिंदी सारांश
Web Title : Sachin Pilgaonkar reveals how he gave 'Yamla Pagla Deewana' title to Dharmendra.

Web Summary : Sachin Pilgaonkar shares fond memories of Dharmendra, recalling their collaborations and how he gifted the title 'Yamla Pagla Deewana' to the legendary actor after receiving a request for it.
टॅग्स :सचिन पिळगांवकरधमेंद्रबॉलिवूड