Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शेट्टीनं मराठी चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाला "परिपूर्ण मनोरंजन आणि कमाल कामगिरी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:39 IST

रोहितनं एका मराठी चित्रपटाचं कौतुक केलंय. 

Rohit Shetty Praised Marathi Film: रोहित शेट्टी (Rohit Shetty) बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याचं मराठी सिनेमा, कलाकार आणि संस्कृतीशी एक वेगळंच नातं आहे. मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला रोहित शेट्टी अनेकदा मराठी कलाकारांप्रती आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतो. त्याच्या 'सिंघम', 'सूर्यवंशी', 'गोलमाल'सारख्या सिनेमांमध्ये मराठी भाषेतील संवाद आणि मराठी कलाकार पाहायला मिळालेत.  शिवाय, रोहितचं मराठी कलाकारांबरोबरचं मैत्रीचं नातंही अनेक कार्यक्रमांतून पाहायला मिळालं आहे. अलिकडेच रोहितनं एका मराठी चित्रपटाचं कौतुक केलंय. 

अलिकडेच रोहित शेट्टी हा 'ये ये ये रे पैसा ३'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात पोहचला होता. यावेळी तो बोलताना म्हणाला, "या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या वेळी मी आलो होतो आणि तो हिट ठरला होता. त्यामुळं या भागाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी मला प्रेशर जाणवतेय. परंतु हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर होईल. चित्रपटाचं नाव सकारात्मक असलं पाहिजे असे म्हणतात. तर या चित्रपटाच्या नावातच 'पॉझिटिव्ह वाईब्स' आहेत. ट्रेलर खूप छान आहे आणि हा चित्रपट म्हणजे बॉलिवूड दर्जाचं परिपूर्ण मनोरंजन आहे. दिग्दर्शक संजय जाधव आणि त्यांच्या टीमनं कमाल कामगिरी केली आहे. माझ्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहेत. आपण सर्वजण नक्की 'ये ये ये रे पैसा ४'च्या ट्रेलर लॉन्चला भेटू", या शब्दात त्यानं कौतुक केलं. 

रोहित शेट्टीचं नव्हे तर महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील 'ये ये ये रे पैसा ३' चित्रपटाचा ट्रेलर आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केलाय. All Good Wishes अशी पोस्ट लिहून बिग बींनी 'येरे येरे पैसा ३'ला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देणं आणि सिनेमाचं कौतुक करणं ही निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे. 

दरम्यान,  'ये ये ये रे पैसा ३' चित्रपटाच्या कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीमराठी चित्रपटसिद्धार्थ जाधव