Join us

रोबोट-2च्या हवाई स्टंट्सची चर्चा,खिलाडी आणि ऍमी ठरणार आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 11:39 IST

खिलाडी अक्षय कुमार आणि त्याच्या प्रत्येक सिनेमाची रसिकांना उत्सुकता असते. सध्या खिलाडी त्याच्या आगामी रोबोट-2 या सिनेमामुळे चर्चेत आहे. ...

खिलाडी अक्षय कुमार आणि त्याच्या प्रत्येक सिनेमाची रसिकांना उत्सुकता असते. सध्या खिलाडी त्याच्या आगामी रोबोट-2 या सिनेमामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक शंकर यांच्या या सायन्स-फिक्शन सिनेमाचं बजेट तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमाचं बजेट जवळपास चारशे कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. रोबोट 2 हा सिनेमा एथिरण या सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिनेमाचा पहिला पार्ट म्हणजे रोबोट हा सिनेमा. यांत सुपरस्टार रजनीकांत आणि ऐश्वर्या राय बच्चन झळकले होते. आता रोबोट 2 या सिनेमाही रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतोय. या सिनेमाचं जवळपास 70 टक्के शुटिंग संपलं असून अखेरच्या टप्प्यातलं शुटिंग बाकी आहे. अखेरच्या टप्प्यातलं हे शुटिंग थोडं विशेष आणि तितकंच खास असणार आहे. कारण या अखेरच्या शुटिंग शेड्युलमध्ये खिलाडी अक्षय कुमार, रजनीकांत आणि अभिनेत्री ऍमी जॅक्सन यांच्यावर एक महत्त्वपूर्ण सीन चित्रीत करण्यात येणार आहे. यासाठी चेन्नईमध्ये एका भव्य सेटची उभारणी करण्यात आली आहे. अभिनेत्री ऍमी जॅक्सन रोबोट 2 साठी बरीच उत्साही आहे. या सिनेमाचं 70 दिवसांचं शुटिंग आटोपलं असून आजवरचा शुटिंगचा प्रवास खूपच भावनिक असल्याचं तिला वाटतंय. मात्र यानंतर अखेरच्या टप्प्यात खरंच खडतर ऍक्शन सीन चित्रीत करण्यात येणार असल्याचं ऍमीने सांगितले आहे. या कठीण ऍक्शन सीनमध्ये हवाई एक्शन सीन्सही असतील असं समजतंय. याशिवाय या सिनेमात रसिकांना हवाई फ्लिप्स, हवाई स्टंट पाहता येणार आहे. खडतर अशा शुटिंगसाठी ऍमीनंही स्वतः खूप तयारी केली आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तिनं बरीच खडतर ट्रेनिंग घेतली आहे.हा सिनेमा हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत रिलीज होणार आहे. सिनेमाचा पहिला टीजर 14 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ऍमी जॅक्सनच्या काही खासगी फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.रोबोट-2 सिनेमाच्या शुटिंगसाठी ऍमीला चेन्नईला जायचं होतं. त्यामुळे मुंबईहून कनेक्ट विमानाने ती जाणार होती. या दरम्यानच्या काळात ती काही काळ एका मोबाईल दुकानात थांबली होती. त्यावेळी कुणीतरी तिचा मोबाईल फोन हॅक केला. फोन हॅक झाल्याचं समजताच ऍमीला जबर धक्का बसलाय. ही साधीसुधी गोष्ट नसून हे प्रकरण गंभीर असल्याचं तिनं सांगितलं आहे. या संदर्भात ऍमी सायबर सेलकडे तक्रार नोंदवणार आहे. आजच्या आधुनिक युगात सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची असल्याचे तिनं म्हटलं आहे. ऍमी आणि तिच्या मैत्रिणीचे डिनर करतानाचे काही खासगी फोटो सोशल साईट्सवर लीक झाले होते. त्यावेळी तिला आपला फोन हॅक झाल्याचं समजलं.