Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा

By तेजल गावडे | Updated: October 3, 2020 10:42 IST

सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा दावा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला तीन महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने गंभीर आरोप करत रिया चक्रवर्तीचे शिवसेनेसोबत असलेल्या कनेक्शनचा तपास करण्याची मागणी केली आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रियावर सुशांतच्या कुटुंबियांनी अनेक आरोप केले आहेत. तसेच सुशांत प्रकरणात शिवसेनेचा एक नेता सामील असल्याचे सुद्धा बोलले जात होते. अशातच आता झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा दावा केला आहे. 

रिया चक्रवर्तीला लोणावळा येथील पवना लेक जवळ जमीन विकत घ्यायची होती. ही जमीन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या क्षेत्रात येते. यामुळे ही जमीन विकत घेण्यासाठी रिया चक्रवर्ती शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या संपर्कात होती, असा दावा सुनीलने केला आहे.

सुनील शुक्लाने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील जमीन खरेदी करण्यासाठी रियाने संजय राठोड यांच्याशी बातचीत केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे ही डील होऊ शकली नाही. याप्रकरणी सीबीआयने तपास करावा, अशी मागणी सुनील शुक्लाने केली आहे. अद्याप शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सुनीलने दिलेल्या माहितीत तथ्य आढळल्यास रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हँगआउट व्हिलामध्ये व्हायची पार्टीलोणावळा येथील पावना लेक परिसरात सुशांत सिंग राजपूतने हँगआउट व्हिला नामक फार्म हाउस भाड्यावर घेतला होता जिथे तो नेहमी सुट्टी व्यतित करत होता. नुकतेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या फार्म हाउसमधून सुशांतचे काही नोट्स आणि दुसऱ्या गोष्टी जप्त केल्या होत्या. तसेच या फार्म हाउसचा केअर टेकर आणि तिथल्या एका बोटमॅनने एनसीबीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये खुलासा केला होता की याच फार्म हाउसवर सुशांतने वेगवेगळ्या वेळी रिया चक्रवर्ती, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरसोबत पार्टी केली होती.

कुणालाच मिळाली नाही NCBकडून क्लीन चिटसुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे की या पार्ट्यांमध्ये सेलिब्रेटींनी ड्रग्सचे सेवन केले की नाही. या प्रकरणी एनसीबीने आतापर्यंत दीपिका पादुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि सिमोन खंबाटाची चौकशी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने आतापर्यंत कुणालाच क्लीन चीट दिलेली नाही. सूत्रांनी दावा केला आहे की आता पर्यंत या प्रकरणात काही मोठ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. ज्यांना चौकशीसाठी एनसीबी लवकरच समन्स बजावणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतशिवसेनासंजय राठोड