Join us

पीएनबी घोटाळ्यावर संतापले ऋषी कपूर; ट्विट करून ‘हा’ प्रश्न केला उपस्थित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 20:42 IST

पंजाब नॅशनल बॅँकेत (पीएनबी) समोर आलेल्या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. जवळपास ११ हजार ४०० कोटी रूपयांचा हा ...

पंजाब नॅशनल बॅँकेत (पीएनबी) समोर आलेल्या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. जवळपास ११ हजार ४०० कोटी रूपयांचा हा घोटाळा आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटळा समजला जात आहे. नीरव मोदीने केलेल्या या घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली आहे. ४८ वर्षीय नीरव मोदी प्रसिद्ध डायमंड ब्रोकर परिवारातून आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडा मोदीसोबतचे सर्व करार तोडण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत आहे, तर दुसरीकडे अभिनेते ऋषी कपूर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मोदीप्रकरणी सूचक वक्तव्य करताना म्हटले की, ‘हर चमकने वाली चीज सोना नहीं होती.’ऋषी कपूर यांनी ट्विट करताना लिहिले की, ‘मला एक गोष्ट समजत नाही की, एखाद्याला २०११ पासून ११ हजार ४०० कोटी रूपयांचे लोण दिले जात आहे अन् त्याबाबतची साधी चौकशीही केली जात नाही? यावरून हे स्पष्ट होते की, ‘चमकने वाली हर चीज सोना नहीं होती.’ अजून बरेचसे हात समोर येणे बाकी आहेत.’ ऋषी कपूरच्या यांच्या या ट्विटनंतर नेटिझन्सनी त्यास रिट्विट करीत त्यांची मते मांडली.  ऋषी कपूर आणि महानायक अमिताभ बच्चन तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत. ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटात दोघे एकदम हटके अंदाजात बघावयास मिळणार आहेत. या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला असून, त्यात दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. या चित्रपटाला ‘ओह माय गॉड’चे दिग्दर्शक उमेश शुक्ला दिग्दर्शित करीत आहेत. चित्रपट वडील अन् मुलाच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या लेखिका सौम्या जोशी असून, हा चित्रपट ४ मे २०१८ रोजी रिलीज होणार आहे.