Join us

नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

By कोमल खांबे | Updated: June 9, 2025 13:01 IST

रेणुका शहाणे यांनी गौहर खानच्या माँ मनोरंजन पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी पहिल्या प्रेग्नंसीनंतरचा अनुभव सांगितला.

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. हम आपके है कौन, सर आखों पर, सुन झारा, दिल ने जिसे अपना कहा, अकल्पित, इम्तिहान अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. हम आपके है कौन सिनेमातील भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी करिअरबद्दल बोलताना वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या. 

रेणुका शहाणे यांनी गौहर खानच्या माँ मनोरंजन पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी पहिल्या प्रेग्नंसीनंतरचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, "मला आधीपासूनच मुलांची आवड होती. मला दोन मुलं तरी हवी होती. राणाजींचं कुटुंब मोठं आहे. २००२मध्ये मी आमच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. मला मुलं हवी असली तरी ते सोपं नव्हतं. मला वाटलं नव्हतं की हे एवढं कठीण असेल. पहिल्या डिलिव्हरीनंतर राणाजींचे एक डॉक्टर मित्र त्यांच्या पत्नीसोबत मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते. ते मला म्हणाले की आता तुला वजन कमी करावं लागेल. पण, हे कसलं प्रेशर आहे, हेच मला कळलं नाही". 

प्रेग्नंसीमधला आणखी एक अनुभव रेणुका शहाणे यांनी शेअर केला. त्या म्हणाल्या, "मी ३६ वर्षांची असताना मला पहिलं बाळ झालं. त्यामुळे मला काळजी होती. पण, बेबी हेल्दी असल्याने मी आनंदी होते. तेव्हाच कुटुंबातील कोणीतरी म्हणालं की थँक गॉड तुला मुलगा झाला. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. आई झाल्याने मी खूश होते. पण, जर मला मुलगी झाली असती तर ते मला असं म्हणाले असते का? असा विचारच कसा काय येऊ शकतो? त्यांचं ते बोलणं माझ्या मनाला लागलं होतं". 

टॅग्स :रेणुका शहाणेप्रेग्नंसी