Join us

वाचा: अनुष्का का जाम भडकली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 15:11 IST

फिल्लोरी चित्रपट क्रिकेटपटू विराट कोहली निर्माण करणार असल्याच्या बातम्यांनी अनुष्का शर्मा जाम भडकली. मी शांत आहे याचा अर्थ मी ...

फिल्लोरी चित्रपट क्रिकेटपटू विराट कोहली निर्माण करणार असल्याच्या बातम्यांनी अनुष्का शर्मा जाम भडकली. मी शांत आहे याचा अर्थ मी कमकुवत आहे, असे मानू नये असा इशाराच अनुष्काने ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये सूत्राचा हवाला देत फिल्लोरी हा चित्रपट अनुष्काचा बॉयफ्रेंड, क्रिकेटर विराट कोहली हा निर्माण करीत असल्याचे वृत्त देण्यात आले होते. ‘अशा चुकीच्या बातम्यांनी आणि ‘बोगस’ सूत्रांमुळे तुम्ही माझा अपमान करीत आहात. मी आज जी काही आहे, ते गेली कित्येक वर्षे केलेल्या परिश्रमाचे फळ आहे. या चित्रपटांसाठी अनेकांनी मदतही केली आहे.’ अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे. क्लीन स्लेट फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओ यांच्यावतीने ‘फिल्लोरी’ची निर्मिती केली जात आहे. यापूर्वी अनुष्काने एन. एच. १० सारखा चित्रपट केला होता. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मी माझे करिअर अतिशय सन्मानपूर्वक जपले आहे. चुकीच्या गोष्टींपासून मी नेहमी स्वत:ला दूर ठेवले आहे. याचा अर्थ तुम्ही माझ्या शांतपणाचा अंत पाहू नका. हा माझा कमकुमवतपणा नाही. मी स्वत:चे चित्रपट निर्माण करण्यास आणि प्रमोट करण्यास सक्षम आहे.’ती आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हणते, ‘काही जणांना लोकांवर चिखलफेक करण्याची सवय असते. एखादी व्यक्ती स्वत:च्या पायावर उभे राहते आणि स्वत:च्या आयुष्यात काही तरी करते आहे, हे त्यांना पाहवत नाही. पुढे हेच लोक महिलांचे सक्षमीकरण, चित्रपटातील सध्याच्या  महिला, चित्रपटातील महिला अशा बाबतीत बोलत असतात. तुमच्यासाठी ही आणखी एक गोष्ट असली तरी तुम्ही एखाद्याच्या आयुष्याशी खेळत आहात. एखादा चित्रपट निर्माण करणे आणि त्याचे प्रमोशन करण्याबाबत मी सक्षम आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही असली पाहिजे, असे अनुष्काने म्हटले आहे.‘फिल्लोरी’ हा चित्रपट अन्शाई लाल हे दिग्दर्शित करीत असून, येत्या २४ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये सूरज शर्मा, मेहेरीन पिरजादा आणि दिलजीत दोसांज यांच्या भूमिका आहेत.