Join us

"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 10:27 IST

माझी बहीण फक्त १३ वर्षांची आहे... रश्मिकाचा खुलासा

एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नेहमी चर्चेत असते. आजकाल जवळपास प्रत्येक बिग बजेट सिनेमात रश्मिका आहे. 'पुष्पा', 'पुष्पा २', 'छावा', 'सिकंदर', 'अॅनिमल' या सर्वच सिनेमांमध्ये रश्मिका दिसली. तिला कमालीचं स्टारडम मिळालं आहे. मात्र यामुळे तिला कुटुंबाला वेळ देणं शक्य होत नाहीये. त्यात तिला एक सख्खी बहीण आहे जी तिच्यापेक्षा चक्क १६ वर्षांनी लहान आहे. कामात व्यग्र असल्यामुळे बहिणीचं बालपणही अनुभवता आलं नाही असा खुलासा रश्मिकाने नुकताच केला.

नॉड मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली, "मला सुट्टी मिळावी म्हणून मी सतत रडत असते. मला एक बहीण आहे जी माझ्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. ती आता १३ वर्षांची आहे. ८ वर्षांपूर्वी मी काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून मी तिला मोठं होताना बघितलेलंच नाही. ती आता जवळपास माझ्याच उंचीची झाली आहे. मी तिला मोठं होताना बघूच शकले नाही. दीड वर्ष झालं मी घरीही गेलेले नाही. मला माझ्या मित्रमैत्रिणींनाही भेटता येत नाही. सुरुवातीला ते मला किमान त्यांच्या प्लॅन्समध्ये तरी धरायचे. पण आता तर ते तेही करत नाहीत. हे फार दु:खद सत्य आहे."

ती पुढे म्हणाली, "माझी आई एकदा म्हणालेली की जर तुला प्रोफेशनल आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वैयक्तिक आयुष्याचा त्याग करावाच लागतो. आणि जर तुला वैयक्तिक आयुष्य हवं असेल तर कामाचा त्याग करावा लागतो. पण मी अशी व्यक्ती आहे जी दुप्पट काम करेल पण दोन्ही आयुष्याचा समतोलही राखेल. ही रोजचीच लढाई असते."

रश्मिकाचा नुकताच 'कुबेरा' हा तेलुगु सिनेमा रिलीज झाला. यामध्ये ती धनुष आणि नागार्जुनसोबत दिसली. आता ती आयुष्मान खुरानासोबत 'थामा' या सिनेमात दिसणार आहे. दिनेश व्हिजन यांचा हा सिनेमा आहे. 

टॅग्स :रश्मिका मंदानाबॉलिवूड