Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rape Case : निर्माता करीम मोरानीचा जामीन अर्ज फेटाळला; पोलिसांना सरेंडर होण्याचे दिले आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 19:15 IST

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेले निर्माता करीम मोरानी यांचा हैदराबादच्या स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांना २२ मार्चपर्यंत ...

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेले निर्माता करीम मोरानी यांचा हैदराबादच्या स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांना २२ मार्चपर्यंत हयातनगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली येथील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा करीम मोरानी यांच्यावर आरोप आहे. या वर्षाच्याच जानेवारी महिन्यात एका २५ वर्षीय युवतीने मोरानी यांच्याविरुद्ध २०१५ मध्ये मुंबई आणि हैदराबादच्या स्टुडिओमध्ये अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. आरोप करणारी तरुणी मोरानी यांच्या मुलीची मैत्रीण असल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार सांगितले की, मोरानीने त्या तरुणीला लग्न करण्याचे खोटे वचन दिले होते. त्यानुसार मोरानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु मोरानी यांनी लगेचच एका स्थानिक न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत त्याचा जामीन मंजूरही केला होता. मात्र पोलिसांनीच न्यायालयात अर्ज करताना मोरानी यांची याचिका रद्द केली जावी अशी मागणी केली होती. हयातनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र गौड यांनी सांगितले की, जेव्हा न्यायालयाने मोरानी यांचा जामीन मंजूर केला होता, तेव्हा आम्ही लगेचच जामीन रद्द केला जावा अशी मागणी न्यायालयात केली होती. यावेळी काही महत्त्वाचे सबळ पुरावेही न्यायालयात सादर केले होते. त्यामुळेच न्यायालयाने आमच्या पक्षाच्या मागणीवर विचार करताना त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता २२ मार्चपर्यंत मोरानी यांना पोलिसांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी हेही स्पष्ट केले की, जर मोरानी यांनी आत्मसमर्पण केले नाही तर, पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. आता मोरानी यांची अटक अटळ समजली जात असून, पुढच्या काही दिवसांत मोरानी यांच्याकडून काही घडामोडी घडणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.