Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कांतारा' वादात रणवीर सिंग अडचणीत; चामुंडी हिल्सवर जाऊन माफी मागणार, १० एप्रिलला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:07 IST

रणवीर हा एका कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.

Ranveer Singh Kantara Controversy : बॉलिवूडचा 'एनर्जी किंग' रणवीर सिंगचा 'धुरंधर २ : द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे.  रणवीरचा अभिनय पाहून सध्या प्रत्येकाच्या तोंडी त्याचेच नाव आहे. प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळी देखील रणवीरचं भरभरून कौतुक करत आहेत. पण, या यशाच्या आनंदात रणवीर हा एका कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.

'कांतारा' चित्रपटातील देवतेची नक्कल केल्यामुळं रणवीर विरोधात तक्रार दाखल झाली होती. ती तक्रार रद्द करण्यासाठी रणवीरनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी काल मंगळवारी (२४ मार्च) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने रणवीरच्या त्या वर्तणुकीला "अयोग्य" ठरवत त्याला कडक शब्दांत सुनावले आहे.

न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठाने म्हटलं, "तुम्ही सुपरस्टार असाल, पण तुम्ही कायद्याच्यावर नाही आहात, हे लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बोलताना, वावरताना सेलिब्रिटींनी जबाबदारीनंच वागायला हवं. इंटरनेट, सोशल मीडिया काहीही विसरत नाही, त्यामुळं विचार करून बोलायला हवं".  रणवीरच्या वतीने ज्येष्ठ वकील साजन पुवय्या यांनी बाजू मांडली. तर सुनावणीवेळी रणवीरचे वडील जगजीत सिंग भवनानी देखील उपस्थित होते.

तक्रारदाराचे वकील सी.जी. मलयाली यांनी असा युक्तिवाद केला की, रणवीरने केवळ ट्विटरवर (X) त्याच्या मॅनेजरमार्फत माफी मागितली आहे, जी अप्रामाणिक वाटते. साजन पुवय्या यांनी रणवीरची बाजू सावरत युक्तीवाद केला की,  "रणवीरला आपल्या चुकीबद्दल मनापासून पश्चात्ताप आहे. रणवीर याप्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. तो स्वतः म्हैसूर इथल्या चामुंडी हिल्सवर जाऊन देवीचं दर्शन घेईल आणि माफी मागेल". दरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण आता १० एप्रिलपर्यंत तहकूब केले आहे. रणवीरने माफीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आश्वासन दिल्याने न्यायालय त्याला दिलासा देते की कारवाईचे आदेश देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रणवीर काय बोलून गेलेला?

गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये रणवीरनेही हजेरी लावली. त्याच्या 'धुरंधर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो आला होता. यावेळी त्याने समोर बसलेल्या ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची स्तुती केली. ऋषभच्या अभिनयाचीही स्तुती केली. मात्र त्याने देवीच्या जागी भूत असा उल्लेख केला आणि ऋषभची नक्कलही केली. ज्यावर आता लोक भडकले. त्यानंतर रणवीरविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत 'हाय ग्राउंड्स' पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh in 'Kantara' Controversy; To Apologize at Chamundi Hills

Web Summary : Ranveer Singh faces legal trouble for mimicking a deity from 'Kantara'. Court reprimanded him, emphasizing responsibility. He will apologize at Chamundi Hills. Hearing adjourned until April 10th.
टॅग्स :रणवीर सिंगकांतारा