राणी मुखर्जीचे वडिल राम मुखर्जी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 14:07 IST
अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे वडिल राम मुखर्जी यांचे आज (22 आॅक्टोबर) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव रूग्णालयातून ...
राणी मुखर्जीचे वडिल राम मुखर्जी यांचे निधन
अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे वडिल राम मुखर्जी यांचे आज (22 आॅक्टोबर) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव रूग्णालयातून त्यांच्या जुहू येथील जानकी कुटीर या घरी आणले गेले. यानंतर दुपारी २ वाजता विले पार्लेस्थित पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपासून राम मुखर्जी आजारी होते. त्यांच्या कुठल्या आजारापणाबद्दल आणखी तपशील अद्याप प्राप्त झालेले नाहीत. राम मुखर्जी हे बॉलिवूडमधले मोठे नाव होते. एक नामवंत दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. त्यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. चित्रपट निर्माते शशाधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होते. हिंदी व बंगालीतील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. मुंबईतील ‘फिल्मालय’ स्टुडिओतील संस्थापक सदस्यांपैकी राम मुखर्जी एक होते. राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट ‘बाइर फुल’याची निर्मिती आणि दिग्दर्शन राम मुखर्जी यांचेच होते. हा बंगली चित्रपट १९९६मध्ये आला होता. यानंतर १९९७ मध्ये राणीने ‘राजा की आएगी बारात’मधून बॉलिवूड डेब्यू केला. हा चित्रपटही राम मुखर्जी यांनी प्रोड्यूस केलेला होता. १९६४मध्ये आलेला दिलीप कुमार व वैजयंती माला यांचा ‘लीडर’ आणि १९६० मध्ये आलेला ‘हम हिंदुस्तानी’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन राम मुखर्जी यांनी केले होते. राणी मुखर्जी हिची आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका आहे तर राणीचा भाऊ राजा मुखर्जी हा सुद्धा प्रोड्यूसर डायरेक्टर आहे. ‘एक बार मुस्करा दो’,‘लीडर’,‘रक्ते लेखा’(बंगाली),‘तोमार रक्ते अमार सोहाग’(बंगाली),‘रक्त नदीर धारा’(ंबंगाली) हे राम मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आहेत.