Join us

"...तेव्हा वडिलांनी मला खूप मारलं होतं", रणबीरने सांगितला ऋषी कपूर यांचा 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 13:45 IST

ऋषी कपूर यांनी रणबीरला लहानपणी दिलेला चोप, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने सांगितला प्रसंग

कपूर खानदानातील लाडका लेक रणबीर कपूर हादेखील बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या रणबीरने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात करिअर करायचं ठरवलं. 'सावरियां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या रणबीरने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली. वडील सुप्रसिद्ध अभिनेता असलेल्या रणबीरनेही त्याची वेगळी ओळख सिनेसृष्टीत निर्माण केली. पण, रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्या नात्यात कायम दुरावा असल्याचं अभिनेत्याने अनेकदा सांगितलं होतं. 

रणबीर कपूरने आई नीतू कपूर आणि बहीण रिधीमा कपूर यांच्याबरोबर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने ऋषी कपूर यांची एक लहानपणीची आठवण शेअर केली. लहानपणी वडिलांनी मारलं होतं, असं म्हणत रणबीरने तो प्रसंग सांगितला. लहानपणी रणबीर चप्पल घालून मंदिरात गेल्याने त्याला ऋषी कपूर यांचा मार खावा लागला होता. रणबीर म्हणाला, "मला एकदाच खूप मार पडला होता. आरके स्टुडियोमध्ये दिवाळीची पूजा होती. माझे वडील खूप धार्मिक होते. मी तेव्हा ८-९ वर्षांचा असेन. मी चप्पल घालून मंदिरात गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला मारलं होतं". 

दरम्यान, रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी रणबीर कसून तयारी करत असल्याचं दिसत आहे. त्याने श्रद्धाभाव म्हणून नॉनव्हेजही सोडलं आहे. तर विशेष ट्रेनिंगही रणबीर घेत आहे. नितेश तिवारी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. रणबीरबरोबर या सिनेमात साई पल्लवी, दाक्षिणात्य अभिनेता यश, साक्षी तन्वर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूरऋषी कपूर