रणबीर कपूरचा खुलासा; संजय दत्तच्या बायोपिकमध्ये नसणार ‘खलनायक’ ट्रॅक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 17:52 IST
संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिकने रिलीज अगोदरच एवढी चर्चा घडवून आणली की, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे; ...
रणबीर कपूरचा खुलासा; संजय दत्तच्या बायोपिकमध्ये नसणार ‘खलनायक’ ट्रॅक!!
संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिकने रिलीज अगोदरच एवढी चर्चा घडवून आणली की, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे; मात्र याकरिता प्रेक्षकांना अजून बरीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात संजूबाबाच्या जीवनातील अनेक खडतर प्रसंग बघावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर काही प्रसंगांना कात्री लावली जाण्याचीही चर्चा आहे. असे झाल्यास त्याच्या चाहत्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, चित्रपटात ‘खलनायक’ ट्रॅकला रिक्रिएट केले जाणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर संजूबाबाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते; मात्र या बातमीत फारसे तथ्य नसल्याचा आता उलगडा करण्यात आला आहे. होय, संजूबाबाची भूमिका साकारणाºया अभिनेता रणबीर कपूरने याबाबतचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, चित्रपटात ‘खलनायक’ ट्रॅक बघावयास मिळणार नाही. आम्ही संजूबाबाच्या ‘खलनायक’च्या काळाचा चित्रपटात विचार केलेला नाही. या चित्रपटात संजूबाबाला एक अभिनेता म्हणून दाखविले जाणार नाही, तर प्रेक्षकांना त्याचे व्यक्तिगत आयुष्य जवळून बघावयास मिळणार आहे. पुढे बोलताना रणबीरने म्हटले की, आम्ही त्याच्या काही चित्रपटांची झलक चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘रॉकी’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे. रणबीरचा हा खुलासा त्याच्या चाहत्यांसाठी काहीसा निराशाजनक असेल यात शंका नाही. असो, सध्या चित्रपटातील काही भागांची शूटिंग सुरू असून, त्यासाठी संपूर्ण टीम न्यूयॉर्क येथे तळ ठोकून आहे. चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त परेश रावल, अनुष्का शर्मा, मनीषा कोइराला आणि दिया मिर्झा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, चित्रपटात राजकुमार हिराणीदेखील एक भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत.