दरवर्षीप्रमाणे यंदाही कपूर कुटुंबियांनी गणेशोत्सव साजरा केला. प्रत्येक वर्षी नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बाप्पाचं विसर्जन करताना दिसतात. आजही त्यांनी पाच दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन केलं. रीतसर पूजा करुन त्यांनी गणरायाला निरोप दिला. मात्र यंदाही आलिया भट त्यांच्यासोबत दिसली नाही. यावरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोलही केलं.
रणबीर कपूर आई नीतू कपूर यांच्यासह गणरायाची मूर्ती घेऊन घराजवळील कृत्रिम तलावाठिकाणी पोहोचला. तिथे गुरुजींच्या सांगण्यावरुन त्यांनी रीतसर आरती केली आणि बाप्पााला निरोप दिला. बाप्पाच्या मूर्तीसमोर त्याने नारळ फोडला. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं. यावेळी रणबीरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर नीतू कपूर या ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये होत्या. दरवर्षीप्रमाणेच यंदाही कपूर कुटुंबाने मनोभावे गणेशाची सेवा केली आणि पाच दिवसांनी निरोप दिला. तसंच रणबीरची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणबीर कपूर लवकरच आपल्या कुटुंबासह नवीन घरी शिफ्ट होणार आहे. राज कपूर ज्या ठिकाणी राहत होते तोच कृष्णराज बंगला आता सहा मजली बंगल्यात रुपांतरित झाला आहे. २५० कोटींचा हा बंगला आहे. रणबीर त्याची आई नीतू, पत्नी आलिया आणि लेक राहाला घेऊन दिवाळीच्या मुहुर्तावर या घरी राहायला जाणार आहे.
रणबीर कपूर आगामी 'रामायण' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तसंच तो आलिया आणि विकी कौशल सह संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मध्येही दिसणार आहे. याशिवाय त्याचे 'अॅनिमल पार्क','ब्रह्मास्त्र २' हेही सिनेमे रांगेत आहेत.