राकेश रोशनचा दावा : ‘क्रिश 4’ असणार भरपूर अॅक्शन व आश्चर्यकारक व्हीएफएक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:20 IST
राकेश रोशन दिग्दर्शित व हृतिक रोशन अभिनित सुपरहिरो ‘क्रिश’सिरीजचा पुढच्या भागाची तयारी सुरू झाली आहे. आम्ही ‘क्रिश 4’ वर ...
राकेश रोशनचा दावा : ‘क्रिश 4’ असणार भरपूर अॅक्शन व आश्चर्यकारक व्हीएफएक्स
राकेश रोशन दिग्दर्शित व हृतिक रोशन अभिनित सुपरहिरो ‘क्रिश’सिरीजचा पुढच्या भागाची तयारी सुरू झाली आहे. आम्ही ‘क्रिश 4’ वर काम सुरू केले असून या चित्रपटात भरपूर अॅक्शन व आश्चर्यकारक व्हीएफएक्स प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी जाहीर केले आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. सुपरहिरो सिरीज ‘क्रिश’चा आपण चौथा भाग तयार करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक राकेश रोशन यांनी सांगितले होते. गणेशोत्सवा दरम्यान एका गणेशमूर्तीला ‘क्रिश’च्या अवतारात पाहून आपल्याला ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सोशल मीडियाहून जाहीर केले होते. या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली असून ‘क्रिश 4’च्या पटकथेवर काम सुरू आहे. राकेश रोशन म्हणाले, जर सर्व ठिक असले तर आम्ही पुढील वर्षी एप्रिल - मे महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू. ‘क्रिश 4’ मोठा प्रोजेक्ट आहे, यामुळे कदाचित शूटिंग 2018 मध्येही सुरू होऊ शकते. आम्हाला व्हीएफएक्सवर बरीच मेहनत करावी लागणार आहे. आमच्या या चित्रपटाचे बजेट मोठे आहे. मात्र आम्ही क्रिशच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिकाधिक आकर्षक करण्याचे ठरविले आहे. ‘क्रिश 4’साठी आम्ही आंतरराष्ट्रीय अॅक्शन दिग्दर्शकाच्या सेवा घेणार आहोत. आम्हाला या चित्रपटात व्हीएफएक्सला नवी उंची मिळवून द्यायची आहे, असेही राकेश रोशन म्हणाले. राकेश रोशन यांच्या सुपरहिरो आधारित ’क्रिश’ची सुुरुवात कोई मिल गया या चित्रपटापासून झाली होती. यानंतर ‘क्रिश’ व ‘क्रिश 3’ या चित्रपटात हृतिक रोशन सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला होता. लवकरच हृतिक रोशनचा काबिल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राकेश रोशन यांच्या फिल्मक्राफ्ट बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे.