सुवर्णा जैन,मुंबईकुणी निंदा, कुणी वंदा, हसवणं हाच आमचा धंदा असं म्हणत कॉमेडीयन राजू श्रीवास्तव रसिकांना पोट धरुन हसवतायत. मजाक मजाक में या नव्या कॉमेडी शोच्या माध्यमातून रसिकांचे लाडके 'गजोधर भैय्या' धम्माल मनोरंजन करतायत. याच निमित्ताने राजू श्रीवास्तव यांच्याशी साधलेला संवाद.
आजवर कॉमेडीयन आणि गरीब हे जणू काही नातं बनलंय. कारण आधी करियर निवडण्यासाठी स्ट्रगल, त्यानंतर घरच्यांची संमती मिळवण्यासाठी आणि त्यानंतर पैसा मिळवण्यासाठी स्ट्रगल हा त्यांच्या वाट्याला असतोच. श्रीमंत घरातून जन्माला आलेला मुलगा कॉमेडीयन बनल्याचे ऐकिवात नाही. घरची हलाखीची परिस्थिती असताना वयाच्या 16-17 व्या वर्षी या क्षेत्रात आलो. सर्वसामान्य पालकांप्रमाणे माझ्याही घरच्यांना वाटायचं की मुलानं शिकावं. डॉक्टर, इंजिनीअर व्हावं. त्यामुळं माझ्या कॉमेडी क्षेत्रात येण्याला घरच्यांचा विरोध होता मग बाहेरच्या जगाचा प्रश्न येतोच कुठे ? त्याकाळी कॉमेडी करणं खालच्या दर्जाचं मानलं जायचं. असं असतानाही गावात काही छोटे कार्यक्रम असले की तिथे जायचो. त्यावेळी लोक आईवडिलांना माझी तक्रार करायचे. आपका लाडला वहाँ नौटंकी कर रहा है, नाच रहा है असं त्यांनी सांगितलं की मला मात्र त्यावेळी खूप सुनावलं जायचं.
मी सुरुवात केली तेव्हा कामं मिळत नव्हती. मग पैसा मिळवण्यासाठी मिळेल ते काम करत स्ट्रगल सुरु ठेवला. कधी कुणाचा सेक्रेटरी बनलो तर कुण्या अभिनेत्यासाठी डबिंग केलं. आम्ही कामं करायचो, मात्र श्रेय कधी मिळालं नाही ना पैसा मिळायचा. यानंतरही जिद्द सोडली नाही आणि स्ट्रगल सुरुच ठेवलं. या स्ट्रगलनं बरंच काही शिकवलं.कॉमेडी करत करत काम सुरु ठेवलं आणि रसिकांचं प्रेम मिळत गेलं. एकदा सलमान खान आणि मी विमानतळावर उभे होतो. त्यावेळी सलमानला भेटण्यासाठी फॅन्सनी गर्दी केली. तेव्हा अचानक काही फॅन्सच्या नजरा माझ्याकडे वळल्या. कैसे हो राजूजी म्हणत काही फॅन्सनी तर चक्क मिठ्या मारल्या. सलमानसमोरच त्यांनी माझं कौतुक सुरु केलं. बडे मजाकियाँ हो आप म्हणत प्रत्येक जण आपुलकीनं विचारपूस करत होता. रसिकांचं हे प्रेम पाहून भारावल्यासारखं झालं.
कॉमेडीला टर्निंग पाँइंट दिला तो 'लाफ्टर चॅलेंज' या शोने. या शोमध्ये आलेले सगळे स्पर्धक खेडोपाड्यातून आले होते. फाइव्ह स्टार हॉटेल, भव्य दिव्य असं काहीही पाहिलं नव्हतं. मात्र या एका शोनं यातील प्रत्येक स्पर्धकाला नाव, प्रतिष्ठा, पैसा, प्रेम, प्रसिद्धी, फ्लॅट, गाड्या सारं काही मिळवून दिलं. एकदा नवीन प्रभाकर हा शो शूट करुन दुबईला गेला. तिथं तो काम करायचा. जेव्हा तो भारतात आला तेव्हा फॅन्सनी त्याला गराडा घातला. हे पाहून काही क्षण तो घाबरला. काय होतंय याची त्याला तसूभरही कल्पना नव्हती. त्यानं तिथूनच मला फोन केला. राजूजी ये क्या हो रहा है, लोग मुझे घेरे हुए खडे है, शो अच्छा चल रहा है उसकी वजह से तो नहीं, असे अनेक प्रश्न त्याने विचारले. ही सारी जादू केली होती ती 'लाफ्टर चॅलेंज' या शोने. एका सामान्य माणसाला या शोने सेलिब्रिटी केलं.
प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही स्पेशल क्षण किंवा टर्निंग पाईंट येतोच. तसा माझ्याही आयुष्यात आला. महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटण्याचा योग आला. त्यांनी माझ्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. ये सब राजूजी आप कैसे कर लेते हो म्हणताच, काय बोलू अन् काय नाही अशी अवस्था झाली होती. झोपण्याआधी एक तास तुमचा शो बघतो आणि मगच झोपतो असं बिग बींनी सांगताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. बिग बींनी मग अभिषेक बच्चनलाही बोलावून घेतलं आणि यांच्याकडून शिका असं सांगितलं. ज्यांना मी दररोज पाहतो, हसतो ते हेच आहेत. तूही यांना बघ आणि चांगलं हिंदी कसं बोलावं हे शिक असं बिग बींनी त्यावेळी ज्युनियर बीला सांगितलं.
कॉमेडी आणि त्यातही स्टँड-अप कॉमेडीला खरी प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता जॉनी लिव्हर यांनी. त्यांच्यामुळंच आमच्या सारख्यांना नव्या संधी मिळायला लागली. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. माझ्यासाठी तर ते साक्षात देव आहेत. कधीही काहीही अडचण असो ते निराश नाही होत. घरात अर्धा कप दूध असेन तरी ते म्हणायचे की कितना सारा दूध है, पुरा मोहल्ला चाय पी सकता है. आपल्याकडे काही कमी असलं तरी त्यात ते भव्यता पाहायचे. इतकं यश, प्रसिद्धी मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर आहे. सा-यांसाठी ते जणू किंग आहेत.
मी शिक्षण पूर्ण केलं नाही याचं आधी वाईट वाटायचं. मात्र आज आठवीच्या इयत्तेत माझ्यावर एक धडा आहे. मनात इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. नरेंद्र मोदींनीही नवरत्नांमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला होता. त्यांची ध्येय, उद्दीष्ट्ये कॉमेडीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतोय. कारण रसिकांना कॉमेडी लवकर समजते आणि त्यातूनच त्यांच्या कामाला हातभार लावण्याचं काम करतोय.