Join us

​शाहरुखच्या वाढदिवशी रिलीज होणार ‘रईस’चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 19:33 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या होम प्रोडक्शचा व त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘रईस’ हा चित्रपट पुढील वर्षी रमजान ईदला प्रदर्शित ...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या होम प्रोडक्शचा व त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘रईस’ हा चित्रपट पुढील वर्षी रमजान ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शाहरुखच्या 51 व्या वाढदिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिवाळीच्या दरम्यान तीन मोठ्या चित्रपटांचे ट्रेलर रिलीज होणार असल्याच्या बातम्या झळकत होत्या यात हृतिक रोशनचा ‘काबील’, आमिर खानचा ‘दंगल’ व शाहरुखच्या ‘रईस’चा समावेश होता. यातही शाहरुखचा मित्र करण जोहर दिग्दर्शित ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटासोबत ‘रईस’चा ट्रेलर रिलीज होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत होता. काबील, दंगल व रईस हे तिनही चित्रपट मोठे असल्याने त्यांच्या ट्रेलर रिलीजच्या बातम्यांना उत आला आहे. दंगल व काबील या दोन्ही चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख टाळता यावी यासाठी शाहरुख खान व सह निर्माता रितेश सिधवानी यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. यासाठी शाहरुखच्या वाढदिवस म्हणजे 2 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.काबील व दंगल या चित्रपटाचे ट्रेलर दिवाळीनंतर रिलीज होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वात आधी रिलीज होणारा चित्रपट रईस असावा असे शाहरुखला वाटत असावे. रईसचे दिग्दर्शन राहुल ढोलकीया करीत असून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान व नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.  26 जानेवारी 2017 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आपल्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना ‘रईस’चा ट्रेलर लाँच करून गिफ्ट देणार हे नक्की!