अजय देवगण आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असलेला 'रेड २' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. 'रेड'नंतर 'रेड २'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. त्यामुळे सिनेमा रिलीज झाल्यानंतर 'रेड २'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करायला सुरुवात केली आहे. या सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'रेड २' सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी १९.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ११.७५ कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी 'रेड २'ने बॉक्स ऑफिसवर १८ कोटींचा बिजनेस केला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने पहिल्या तीनच दिवसांत ४९.२५ कोटी कमावले आहेत. आता रविवारी 'रेड २'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
'रेड २' हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा सीक्वल आहे. या सिनेमात रितेश देशमुख, अजय देवगण, वाणी कपूर, सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात अजय देवगण अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे.