Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधिका आपटेला साउथ सिनेइंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, स्वतःच केला खुलासा; म्हणाली-"ते खूप वाईट लोक होते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:13 IST

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिने बंगालीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत विविध कामे केली आहेत. अलीकडेच राधिकाने एका मुलाखतीत साउथ सिनेमाच्या सेटवर आलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला.

अभिनेत्री राधिका आपटेला सिनेइंडस्ट्रीमध्ये २० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज राधिका अशा स्थानावर आहे जिथे ती स्वतःच्या मर्जीने निर्णय घेऊ शकते, तिला कोणती भूमिका करायची आहे आणि कोणती नाही हे ती ठरवू शकते; पण सुरुवातीच्या काळात परिस्थिती अशी नव्हती. राधिकाने २००५ मध्ये 'वाह! लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर २००९ मध्ये 'अंतहीन' या बंगाली चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. राधिकाला खरी ओळख २०१५ मध्ये आलेल्या 'बदलापूर' चित्रपटामुळे मिळाली आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. दरम्यानच्या काळात राधिकाने साउथच्या चित्रपटातही काम केले, मात्र तिथे तिला अत्यंत वाईट अनुभव आला.

राधिका आपटेने काही मोठ्या लोकांद्वारे बनवलेल्या हिंदी चित्रपटांपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले. मात्र २००० च्या त्या दशकात जेव्हा तिने साउथचे चित्रपट केले, तेव्हा तिला तिथे लिंगभेदाचा सामना करावा लागला. राधिकाने यावेळी कोणाचेही नाव घेतले नाही, पण ती हे स्पष्टपणे म्हणाली की, "ते खूप वाईट लोक होते." राधिका आपटेने 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी अशा अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले नाही, जिथे असा भेदभाव होतो. मला काही लोकांनी ऑफर्स दिल्या होत्या आणि मी त्यांना भेटायलाही गेले होते. पण जेव्हा मला परिस्थितीची जाणीव झाली, तेव्हा मी ठरवले की मी त्यांच्यासोबत कधीच काम करणार नाही. ते खूप वाईट लोक आहेत आणि खूप मोठी माणसे आहेत. मी जर त्यांची नावे सांगायला सुरुवात केली, तर तुम्ही थक्क व्हाल, पण हो, मी त्या लोकांसोबत कधीही काम करणार नाही."

पैशांसाठी केले साउथचे चित्रपट, पण सेटवर सहन करावा लागला छळ राधिकाने पुढे सांगितले की, तिला पैशांची खूप गरज असल्याने तिने साउथचे चित्रपट स्वीकारले, पण तिथेही तिला त्रासाचा सामना करावा लागला. राधिका म्हणाली, "मला खरोखर पैशांची गरज होती, म्हणून मी काही साउथचे चित्रपट केले. पण अशा काही चित्रपटांच्या सेटवर मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. मला आठवतेय की, एका चित्रपटाच्या सेटवर मी एकमेव महिला होते. आम्ही एका लहान शहरात शूटिंग करत होतो. तिथे ते लोक माझ्या ब्रेस्टवर पॅडिंग लावू इच्छित होते. ते म्हणू लागले, 'अम्मा, अजून पॅडिंग लाव.' मी त्यांना विचारले की, अजून किती पॅडिंग लावायचे?"

राधिका आपटेने पुढे सांगितले की, "त्या सेटवर मी एकमेव महिला होते. माझा कोणताही मॅनेजर नव्हता, कोणताही एजंट नव्हता. माझ्या टीममध्ये सर्व पुरुष होते, कारण त्यांनीच मला ही भूमिका दिली होती. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, ''नाही, तुम्हाला तुमची स्वतःची टीम तयार करण्याची परवानगी नाही'."

''कोणत्याही महिलेला अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये'' राधिका आपटे म्हणाली की, "ती सहसा खूप स्पष्टवक्ती आणि धाडसी आहे, तरीही त्या दिवसांची आठवण काढली की ती आजही हादरून जाते." राधिका पुढे म्हणाली, "मला पुन्हा कधीही त्या परिस्थितीत जायचे नाही, कारण मला रडू येईल. ते खरोखरच वेदनादायक होते. कोणत्याही महिलेला अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये किंवा कोणावरही अशी वेळ येऊ नये असे मला वाटते." राधिकाने या कार्यसंस्कृतीसाठी केवळ पुरुषांनाच नाही, तर उच्च पदावर काम करणाऱ्या महिलांनाही जबाबदार धरले आहे. ती म्हणाली, "अनेक महिला आज पॉवरफुल पदांवर आहेत ज्या बदल घडवून आणू शकतात, पण त्या तसे करत नाहीत. हीच गोष्ट मला सर्वात जास्त अस्वस्थ करते." 

English
हिंदी सारांश
Web Title : Radhika Apte reveals bad experiences in South Indian film industry.

Web Summary : Radhika Apte faced sexism in South cinema, revealing a traumatic experience involving pressure for breast padding and restricted team choices due to money constraints. She urges powerful women to foster change.
टॅग्स :राधिका आपटे