Join us

'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:52 IST

'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' सारख्या लोकप्रिय सिनेमांसाठी काम करणाऱ्या कलाकारांचं दुःखद निधन झालं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

हिंदी मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग', 'वॉन्टेड' अशा सिनेमांसाठी सेट्स उभारणारे प्रॉडक्शन डिझायनर वासिक खान (wasiq khan) यांचं निधन झालंय. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विनी चौधरी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली. वासिक खान यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी वासिक खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

वासिक खान यांचं निधन

बॉलिवूडमधील वास्तववादी सिनेमांसाठी शानदार सेट्स बनवणारे प्रॉडक्शन डिझायनर वासिक खान यांचं निधन झालंय. मूळचे दिल्लीचे असणारे वासिक यांनी १९९६ साली जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून कला शाखेत पदवी घेतली. वासिक खान यांचे वडील एक इंजीनिअर होते. परंतु वडिलांच्या वाटेवर न जाता वासिक यांनी कलादिग्दर्शन आणि सिनेमाची वेगळी वाट निवडली. कॉलेजच्या दिवसांमध्ये लोकप्रिय कला दिग्दर्शक समीर चंदा यांच्याशी त्यांची भेट झाली. 

पुढे वासिक खान मुंबईत आले आणि त्यांनी कमालिस्तान स्टूडिओमध्ये बॅकड्रॉप पेंटरच्या रुपात त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर समीर चंदा यांच्यासोबत वासिक खान यांनी 'इरुवार' या तामिळ सिनेमासाठी आणि श्याम बेनेगल यांच्या 'हरी भरी' या सिनेमासाठी काम केलं. इथून त्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 

वासिक यांनी नंतर अनुराग कश्यप यांच्यासोबत अनेक सिनेमांसाठी काम केलं. 'दॅट गर्ल इन यल्लो बूट्स', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'ब्लॅक फ्रायडे', 'गुलाल', 'नो स्मोकिंग' अशा अनुराग कश्यप यांंच्या सिनेमासाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम केलं. 'गँग्ज ऑफ वासेपूर' सिनेमामुळे त्यांना खऱ्या अर्थाने खूप लोकप्रियता मिळाली. 'रामलीला', 'रांझणा', 'टॅक्सी नंबर ९२११', 'तनू वेड्स मनू', 'तेरे बिन लादेन' अशा सिनेमांसाठी त्यांनी केलेलं कलादिग्दर्शन विशेष गाजले. वासिक खान यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलादिग्दर्शक गमावल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.

टॅग्स :बॉलिवूडटेलिव्हिजनअनुराग कश्यप