Join us

एकेकाळी दिग्दर्शक प्रियंका चोप्राचा करायचे अपमान, त्या एका सल्ल्याने बदलले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 06:00 IST

प्रियंकाला तिच्या करियरच्या सुरुवातीला अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले होते.

ठळक मुद्देप्रियंकाने सांगितले आहे की, मी बॉलिवूडमध्ये नवीन होती. मी कोणालाच ओळखत नव्हते. माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या होत्या. माझ्यावर दिग्दर्शक अक्षरशः ओरडायचे... मला काहीही कारण नसताना चित्रपटातून बाहेर काढले जायचे. 

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राचा देसी गर्लपासून ते हॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रियंकाचे जगभरात असंख्य चाहते असून तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोव्हर्स आहेत. बॉलिवूडमध्ये प्रियंका चोप्राच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिथेदेखील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. पण प्रियंकासाठी हा प्रवास सोपा नव्हता.

प्रियंकाला तिच्या करियरच्या सुरुवातीला अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले होते. तिने वॉग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत प्रियंकाने सांगितले आहे की, मी बॉलिवूडमध्ये नवीन होती. मी कोणालाच ओळखत नव्हते. माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या होत्या. माझ्यावर दिग्दर्शक अक्षरशः ओरडायचे... मला काहीही कारण नसताना चित्रपटातून बाहेर काढले जायचे. पण माझ्या वडिलांच्या एका सल्ल्याने माझे संपूर्ण आयुष्य बदलले. ते मला सांगायचे, जास्त ऐक पण कमी बोल...

प्रियंकाने मिस वर्ल्ड बनल्यानंतर सनी देओलच्या द हिरोः ऑफ ए स्पाय या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात प्रीती झिंटादेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाला नसला तरी तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने अंदाज या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अक्षय कुमारच्या अंदाज या चित्रपटात तिच्यासोबत लारा दत्ता देखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील प्रियंकाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. 

प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री असून तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने आजवर बर्फी, डॉन, बाजीराव मस्तानी, फॅशन, मेरी कोम, कमीने यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला आजवर तिच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला असून तिला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. 

प्रियंका चोप्राच्या स्काय इज पिंक या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा