Join us
Daily Top 2Weekly Top 5

मादाम तुसादमध्ये प्रियंका चोप्राचा मेणाचा पुतळा! रचला इतिहास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 10:20 IST

होय,वाढत्या लोकप्रियतेने आपल्या या देसी गर्ल मादाम तुसाद संग्रहालयात पोहचवले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित मादाम तुसाद संग्रहालयात प्रियंकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

ठळक मुद्दे लवकरच प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होतोय.  याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूडपटातही ती दिसणार आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा केवळ बॉलिवूड अभिनेत्री राहिलेली नाही तर ग्लोबल स्टार बनलीय. आता तर तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. होय,वाढत्या लोकप्रियतेने आपल्या या देसी गर्ल मादाम तुसाद संग्रहालयात पोहचवले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित मादाम तुसाद संग्रहालयात प्रियंकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही तर लवकरच लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याचसोबत प्रियंका मादाम तुसादच्या चार संग्रहालयात जागा मिळवणारी पहिली ग्लोबल सेलिब्रिटी बनली आहे. आत्तापर्यंत केवळ अमेरिकन गायिका व अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन एक अशी सेलिब्रिटी होती, जिचे मादाम तुसादच्या तीन संग्रहालयात मेणाचे पुतळे होते.

प्रियंकाने न्यूयॉर्कस्थित मादात तुसाद संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी स्वत:चा मेणाचा पुतळा पाहून ती हरकली नसेल तर नवल. आपल्या सोशल अकाऊंटवर या मेणाच्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो व व्हिडिओ तिने पोस्ट केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका कायम चर्चेत आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. तिच्या या लग्नाचीही जगभर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत प्रियंकाने हॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.

टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मधून प्रियंका हॉलिवूडमध्ये दाखल झाली आणि मग तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर बेवॉच, अ किड लाईक जेक अशा हॉलिवूडपटात ती झळकली. लवकरच तिचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होतोय.  याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूडपटातही ती दिसणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर व जायरा वसीम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासमॅडम तुसाद संग्रहालय