Join us

प्रियंका चोप्राने केली होती नाकाची प्लास्टिक सर्जरी, पण ती फसल्याने प्रियंका दिसत होती अशी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 06:00 IST

प्रियंकाने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधी नाकावर सर्जरी केली होती. त्यामुळे ती खूपच विचित्र दिसत होती.

ठळक मुद्देप्रियंकाने तिच्या नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती आणि त्यामुळे तिचे नाक खूपच विचित्र दिसत होते. काही दिवसांचे फिल्म सिटीमध्ये चित्रीकरण करून लंडनला रवाना व्हायचे चित्रपटाच्या टीमने ठरवले होते.

प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री असून तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने आजवर बर्फी, डॉन, बाजीराव मस्तानी, फॅशन, मेरी कोम, कमीने यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला आजवर तिच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला असून तिला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. 

प्रियंकाने सनी देओलसोबत द हिरोः ऑफ ए स्पाय या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात प्रीती झिंटादेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाला नसला तरी तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने अंदाज या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

द हिरोः ऑफ ए स्पाय या चित्रपटाच्याआधी प्रियंकाने एक चित्रपट स्वीकारला होता. पण तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधी नाकावर सर्जरी केलेली असल्याने तिला हा चित्रपट गमवावा लागला होता. २०१८ मध्ये प्रियंका चोप्राच्या आयुष्यावर प्रियंका चोप्रा : अ डार्क होर्स हे पुस्तक लिहिण्यात आले होते. या चित्रपटाचे लेखन भारती प्रधानने केले होते. या पुस्तकात लिहिण्यात आले होते की, प्रियंकाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती आणि त्याचवेळी तिने एक चित्रपट साईन केला होता. या चित्रपटात बॉबी देओल तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता तर महेश मांजरेकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. या चित्रपटाची निर्मिती विजय गलानी यांची होती. 

गलानी यांनी या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या दिवसाविषयी सांगितले होते की, संपूर्ण मीडिया मुहूर्तासाठी उपस्थित होती. पण त्याचवेळी प्रियंकाचे मॅनेजर प्रकाश जाजू मला प्रियंकाला एकदा तुम्ही भेटून घ्या असे वारंवार सांगत होते. त्यामुळे मी तिच्या रूममध्ये गेलो. पण तिथे गेल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिने तिच्या नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती आणि त्यामुळे तिचे नाक खूपच विचित्र दिसत होते. काही दिवसांचे फिल्म सिटीमध्ये चित्रीकरण करून आम्ही लंडनला रवाना व्हायचे ठरवले होते. पण या अवस्थेत कसे चित्रीकरण करायचे हा प्रश्न मला पडला होता. प्रियंकाचे म्हणणे होते की, पुढील महिन्यात चित्रीकरण सुरू होईपर्यंत सगळे व्यवस्थित होईल. अखेरीस तो चित्रपट न करण्याचेच मी ठरवले. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉबी देओल